पंचवटी : पी. डी. गोराणकर
गोदावरी तीरावरील तपोवन परिसरात महावीर सौभाग्य उमेश सेवाभावी संस्था आणि श्री संघ केवडीबन स्थानक यांच्या वतीने भव्य 'नवकार महामंत्र स्तूप' आणि २४ तीर्थंकर केवडीवृक्ष वन' निर्माण करण्यात येणार आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान पंतप्रधान यांच्या हस्ते या भव्य प्रकल्पाचे उद्घाटन करण्याचा आयोजकांचा मानस असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. पारस सुराणा यांनी बुधवारी (दि. १५) पत्रकार परिषदेत दिली.
जैन धर्मियांचा कुंभ मानला जाणारा 'चातुर्मासिक धार्मिक उपक्रम' या महिन्याच्या शेवटी सुरू होत आहे. या धार्मिक पर्वाची सुरुवात शनिवारी (दि. १८ जुलै) सकाळी कोकिळकंठी तपस्वी डॉ. पुण्यशिला, डॉ. कीर्तिशिला आणि सिद्धिशिला आदी साध्वीजींच्या मंगल प्रवेशाने होणार आहे.
पत्रकार परिषदेला माजी आमदार बाळासाहेब सानप, डॉ. दिलीप खेवसरा, ब्रिजलाल कटारिया, चातुर्मास अध्यक्ष प्रवीण खादविया, मनीष चुरीवाला, सुरेश दठिया, सुभाष खेवसरा व अनिल नहार आदी मान्यवर उपस्थित होते.
'नवकार महामंत्र स्तूप' तब्बल १०८ फूट उंच असणार आहे. या स्तूपाखाली एकाच वेळी ४० साधक भाविकांसाठी बसून शांततेत तपश्चर्या व ध्यान करण्याची विशेष व्यवस्था केली जाणार आहे.
जैन परंपरेनुसार वाटिकेत वटवृक्ष (वड), सप्तपर्ण, शाल, प्रियंगू, छत्र, महुआ, शिरीष, नागवृक्ष, सल्लकी, पिलु, तेंदू, कदंब, जांभूळ, अशोक, दधिपर्ण, नंदीवृक्ष, तिलक, आम्रवृक्ष, चंपक, वरुण, बकुळ, वेत, धव आणि शाल या २४ वृक्षांची लागवड केली जाईल.
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर तपोवनात जैन धर्मियांच्या वतीने धार्मिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
जैन धर्मातील २४ तीर्थंकरांना ज्या पवित्र वृक्षांखाली 'केवळज्ञान' (ज्ञानप्राप्ती) प्राप्त झाले होते, त्या सर्व वृक्षांची लागवड करून 'केवलीवृक्ष वन' आणि '२४ तीर्थंकर केवळज्ञान वाटिका' विकसित केली जाणार आहे. या ठिकाणी प्रत्येक तीर्थंकराची माहिती, त्यांचा जीवनप्रवास आणि ज्ञानप्राप्तीची कथा भाविकांना जाणून घेता येईल.
या पर्यावरणपूरक प्रकल्पासोबतच तपोवन येथे आगामी दोन वर्षे भव्य चातुर्मासिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. आगामी चार महिन्यांच्या चातुर्मास काळात भाविकांना पूज्य साध्वीजींच्या पावन सान्निध्यात सत्संग, प्रवचन आणि आध्यात्मिक धर्मलाभ घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.