

कृष्णा जाधव - मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई
साडेपाच वर्षापासून आपण "माऊली" सदराचा आस्वाद घेत आहोत. याच सदरात मी "श्री ज्ञानेश्वरी" मधील १७ अध्यायांचे निरूपण केले. माझ्यासारख्या सर्वसामान्य वारकऱ्यांकडून माऊलींनी ही सेवा करून घेतली, हे माझे परमभाग्य. वाचकांनी या सदरातून माऊली तत्त्वज्ञानाचा आस्वाद घेत, मला लेखामधील बारकावे कळविले, अधिक-उणे सांगितले. विशेषत: प्रोत्साहनही दिले त्याबद्दल मी पुढारीच्या सर्व वाचकांचे ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर पुढारी परिवाराचेही आभार मानतो आणि निरूपणास प्रारंभ करतो.
अठरावा अध्याय हा कळस अध्याय. गीतातत्त्वज्ञानाचा कळस; तितकाच सर्वांगसुंदर. हजारो वर्ष ज्या तत्त्वज्ञानाचे मंदिर जगाला ज्ञानप्रकाश देत आहे. त्या मंदिराचा लखलखणारा कळस तितकाच देदीप्यमान आहे, जो नित्य नवा चैतन्याचा स्त्रोत. पुढील लाखो वर्ष या तत्त्वचिंत्तनाची साक्ष देण्यासाठी सज्ज अगदी युगांतापर्यंत !!!
श्री ज्ञानेश्वर माऊली या अध्यायाच्या प्रारंभी श्रीगुरु निवृत्ती नाथांची स्तुतिसुमनांनी पूजा मांडतात. दिव्यप्रकाशक, मंगलकारक, बलशाली, लाभदायक, कालातीत, सर्वरूप संपन्न, स्वयंप्रकाशित, शुद्धरूप, त्रिविधतापनाशक, कल्पतरू या उपमांनी श्रीगुरुंचा गौरव करतात. त्यांच्या स्मरणात "मीपण" गळून जाते. श्रीगुरुंचे स्मरण करताना माऊली अगदी हळवे होतात.
स्तुति कांही न बोलणें। पूजा कांही न करणें।
सन्निधी काही न होणें। तुझ्या ठायी॥
श्री निवृत्तीनाथांचा जयजयकार करताना अगदी "देव" हाच योग्य आणि परिशुद्ध शब्द माऊली वापरत. त्यांच्या हृदयात श्रीगुरूंविषयी असणारा अत्यंतिक आदर प्रगट करतात. ज्या गुरुंनी आत्मज्ञानाची ज्योत प्रज्वलित केली त्यांच्या प्रशंसेला शब्द थिटे पडतात.
अंतःकरणातील "भाव" कागदावर मांडता येत नाहीत ही खंत माऊलींना पडलेली आहे. "ब्रह्मानंदस्वरुपाची" मूर्ती श्री निवृत्तीनाथ, त्यांना जगातील कोणत्याही उपाधीने गौरविले, अगदी माय-बाप-गुरू त्यातही उपाधीची उष्टावळ लागते. म्हणून स्वअस्तित्व विसरून तुमच्याशी एकरूप होणे हीच योग्य स्तूती ठरेल असे माऊली नम्रपणे म्हणतात.
गीतामंदिराचे सुंदर रूपक :- गीतारूपी मंदिराचे सुंदर रूपक माऊली निर्माण करतात ते विलोभनीय आहे, ते पुढीलप्रमाणे - गीतारूपी मंदिराचे शिल्पकार "व्यास." व्यासांनी अत्यंत कुशाग्र बुद्धीने "वेदरूपी" रत्नखचित पर्वतावर उपनिषदाच्या अर्थरूपी भूमिमध्ये खणायला प्रारंभ केला. या ठिकाणी धर्म-अर्थ- काम असे भिन्न आकारांचे दगड निघाले, त्यांनी देवालयाच्या भोवती तट बांधला. त्याच जमिनीत आत्मज्ञानाचा मोठा दगड निघाला, त्या दगडावरील भ्रमसंशयाचे आलेली पुठं साफ करून "कृष्ण-अर्जुन" संवादाचा चिरा तयार केला. या संवादातून निर्माण झालेले असंख्य चिरे मंदिराच्या दर्शनी भागास लावले.
चिऱ्याची भिंत ओळींब्यात येण्यासाठी निवृत्तीरूपी दोरीतून "धर्माचा ओळींबा" सोडला. मोक्षाच्या प्राप्तीसाठी गीतामंदिराचा एक-एक अध्याय थर रूपाने मंदिर उभारणीचे कामास आला. पंधरा अध्यायापर्यंत पंधरा थर अनुक्रमे विषादयोग, ज्ञानयोग, कर्मयोग, ज्ञानकर्मसंन्यास योग, कर्मसंन्यासयोग, आत्मसंयमनयोग, विज्ञानयोग, अक्षरब्रह्मयोग, राजविद्याराजगुह्ययोग, विभूतीयोग, विश्वरूपदर्शनयोग, गुणत्रयविभागयोग, पुरुषोत्तमयोग पूर्ण झाल्यानंतर. 16वा अध्यायाने मंदिराचा घुमट "दैवासुरसंपत्ती विभागयोग" तयार झाला. हा देखणा आणि डेऱ्याच्या आकाराचा सुंदर-सुबक घुमट म्हणजे या मंदिराचे वैभवच होय.
या घुमटावर ठाण मांड ठोकून बसलेला 17 वा अध्याय श्रद्धात्रयविभागयोग. हा मंदिराच्या कळसाची बैठक. 18 वा अध्याय हा गीतामंदिरावरील भव्य दिव्य "मोक्षसंन्यासयोग" स्वरूपी कळस. या मोक्षसंन्यासरूपी योग अध्यायाच्या शेवटी "श्री ज्ञानदेवांच" पसायदान ज्यानं विश्वातील सर्व कवितांच्या अग्रभागी आपलं स्थान निश्चित केले. विश्वातील सर्व धर्माच्या प्रार्थना जिथे आदरानं विस्मयचकीत झाल्या. ज्या मागण्यानं देव वेडावला, वारकरी भारावला, चरा-चराला साम्यत्वाने पाहण्याचा आणि "वसुधैव कुटूंबकम्" या ब्रीदवाक्याचा ज्याने जयघोष केला. तत्त्वज्ञानाच्या भाळावर गीतारूपी तिलक लावून जो आजही डौलाने डोलतो आहे. असा अठरावा अध्याय,
ज्याच्या निरूपणाला मी माऊलींचा नतमस्तक होत, त्याचा कृपाशीर्वाद विनम्रपणे आपणासर्वांच्या साक्षीने मागतो आहे. माऊलींच्या आणि श्रीनिवृत्तीनाथांच्या प्रेमाशिर्वादाने आपण या अध्यायाचा प्रत्येक लेखातून मनसोक्त आनंद घेऊयात. सतराव्या अध्यायात "त्रिगुण" आणि "कर्म" याचा अत्यंत सखोल विचार आपण केला आहे. या चिंतनात यज्ञ, दान, तप, उपासना, आहार आणि श्रद्धा ही महत्त्वाची "कर्म" अभ्यासताना त्यांचा रज-तमाशी संबंध येताच, ती कशी मलीन होतात याविषयी आपण चिंतन केले, त्याचबरोबर "सत्व" या गुणाशी याच कर्माचा संबंध आला की त्यांचं स्वरूप कसं बदलते हेही अभ्यासलं.
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाशी, नव्हे-नव्हे जीवनातील प्रत्येक क्षणांशी सत्व याचा संबंध "कर्माशी" लावल्यानंतर जो बदल त्या व्यक्तिच्या जीवनात होतो, तो खरा चमत्कार आहे. सतराव्या अध्यायाने आमच्या अठराव्या कळस अध्यायाची ठेवण तयार झाली आहे. सतराव्याच्या शेवटी आपण पाहिले की " ॐ तत् सत्" (ॐ भगवंत नामस्मरणाने केलेली कर्मे अहंकारास विसर्जीत करून भगवंतासच अर्पण केली जातात.) म्हणजे काय? याचा अर्थ समजून घेतला. अंतःकरणात हृदयावर कोरलेला समर्पणाचा "शुद्ध भाव" कोणतेही कर्म करताना खूप-खूप महत्वाचा, आयुष्याची संपूर्ण दिशा आणि अर्थच बदलवणारा, अद्भुत असाच आहे. हा भाव सोडून म्हणजे अस्तीक्य भाव व बुद्धी सोडून यज्ञ, दान, तप, श्रद्धा, उपासना इ. जी-जी कर्मे आपणांकडून केली जातील ती सर्व "व्यर्थ" होतात.
कर्माप्रतीची आपल्या सर्वांची अस्तीक्य बुद्धी किती महत्त्वाची आहे !!! हे एकदा लक्षात झाले की तुमचे - माझे जीवन सात्विक नीतीमूल्य, नैतिक तत्वे, सदाचार, मूल्याधिष्ठित वर्तनाशी किती बांधलेले आहे हे तुम्हा-आम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही. किंबहुना या शिवाय आमचे जीवन हे मानवी जीवन नव्हेच. ते फारतर भूतलावर जन्मलेल्या एका प्राण्यांचे जीवन म्हणावे लागेल. ज्या प्राण्यांना भगवंताने फक्त भूक, भय, निद्रा, आणि मैथून दिलेले आहे पण बुद्धी किंवा विवेक नाही. १७ अध्यायातील या सिद्धांताने तुमच्या-माझ्या डोळ्यावरील अंधःकाराची झालर बाजूला केली. कर्म करताना आणि जीवन जगताना सत्याप्रतीची आमची दायित्व-भावना जागी होतेच होते. भारतीय आणि गीता तत्त्वज्ञानाने जीवन हे नैतिकतेच्या खुंटीला घट्ट बांधलेले आहे. या गोष्टीला जो विसरेल तो "अज्ञानी" किंवा “आंधळाच”
तो अज्ञानांधु तंव बापुडा। ईश्वररूची न देखे एवडा।
तेथ नावेक ते पुढां। का सुझे तेया ॥
माऊली वरील ओवीत अशा अज्ञानाने ग्रासलेल्या व्यक्तिचं वर्णन करताना म्हणतात, अज्ञानाने अंध झालेला कर्मनिष्ठ सर्वत्र सम प्रमाणात व्यापक असणाऱ्या ईश्वराला पाहू शकत नाही; तर त्यापुढील ॐ तत् सत् या भावनेप्रती तो कसा पोहचणार? (क्रमश:)