One crore fraud of Mobile Company
नाशिक : पुढारी वृत्तसेवा मोबाइल कंपनीची एक कोटी दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांवर गंगापूर पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. २३) गुन्हा दाखल करण्यात आला. दीप्ती सोनजे, संदीप सोनजे, दीपक मोटे, भूषण आहेर अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
स्वप्निल लवटावार (उंदरी, पुणे) यांच्या फिर्यादीहून तक्रार नोंदविण्यात आली आहे. संशयितांना मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीची एजन्सी मिळालेली होती. त्यादरम्यान त्यांनी कमिशन स्ट्रक्चरमध्ये फेरफार करून मोबाइल कंपनीची एक कोटीहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे.
स्वामीराज एन्टरप्रायजेसतर्फे मालक दीप्ती सोनजे यांचे कार्यालय फ्लॅट नं. ५ डिवाईन नेस्ट अपार्टमेंट, महात्मानगर, नाशिक या ठिकाणी आरोपींनी सप्टेंबर २०२२ ते डिसेंबर २०२२ दरम्यान त्यांचा डिस्ट्रीब्युटर्स आयडी व ई टॉपअप लॉगिन आयडीचा उपयोग करून वारंवार कंपनीच्या ई टॉपअप अॅप्लिकेशन सिस्टीममध्ये अनधिकृतपणे कमिशन टाइपमध्ये बदल करून घेतले.
डिफॉल्ट प्रोफाइल बदलून एम.एन.पी. प्रोफाईल केले. याद्वारे संशयितांनी अतिरिक्त कमिशन मिळविले. जे नियमित कमिशन मिळायचे होते त्यापेक्षा अधिक कमिशन ई टॉपअप बॅलन्स स्वरूपात कंपनीकडून एक कोटी ०२ लाख ४० हजार ७७४ रुपये मिळविले.
यामध्ये तकदीर किराणा संदीप सोनजे-सव्वा लाख, अंजली अॅक्सेसरीज ३२ लाख २६ हजार २६५ व एस एस टेलिकॉम भूषण आहेर ५६ लाख ६१ हजार २७१ यांनी एकूण एक कोटी दोन लाख ४० हजार ७७४ रुपयांची मोबाइल कंपनीची फसवणूक केली.
संशयितांनी सिस्टीममध्ये फेरफार करून अतिरिक्त कमिशन तर मिळविलेच. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असलेल्या वितरकांनाही अवैधरीत्या कमिशन मिळवून दिले.