Nashik Ramzan Market 
नाशिक

Nashik Ramzan Market | जिन्ना टोपी ते ओमानी नक्षीकाम! रमजाननिमित्त नाशिकमध्ये टोप्यांचे शेकडो नवनवीन प्रकार दाखल

Nashik Ramzan Market | मुस्लीम समाजात टोपी घालण्याची परंपरा महत्त्वाची मानली जाते. अरबी भाषेत 'तकिया', तर जगभरात 'कुफी' म्हणून ओळखली जाणारी ही टोपी श्रद्धा, नम्रता आणि ओळखीचे प्रतीक आहे.

पुढारी वृत्तसेवा

जुने नाशिक : नदीम शेख

मुस्लीम समाजात टोपी घालण्याची परंपरा महत्त्वाची मानली जाते. अरबी भाषेत 'तकिया', तर जगभरात 'कुफी' म्हणून ओळखली जाणारी ही टोपी श्रद्धा, नम्रता आणि ओळखीचे प्रतीक आहे. रमजानमध्ये नवीन टोपी घालून नमाज अदा करणे आणि ईदच्या नमाजसाठी सजणे ही परंपरा असल्यामुळे विक्रीत मोठी वाढ झाली आहे.

'कुफी' हे नाव 'कुफा' या इराकमधील शहरावरून पडले. भारतात सुफी संतांच्या आगमनानंतर आणि मुघल साम्राज्य काळात टोपी संस्कृती अधिक लोकप्रिय झाली. डायमंड, अफगाणी, कराची, राजस्थानी एम्ब्रॉयडरी, अश्रफी, बांगलादेशी, इंडोनेशियन टोपी डिझाइन आणि स्टाइलमुळे तरुणांमध्ये आकर्षण आहे.

लहान मुलांमध्ये सध्या 'अर्तागुल' स्टाइल टोपीची क्रेझ पाहायला मिळते. उत्तर प्रदेशातील रामपूर, बरेली आणि लखनऊ ही शहरे टोपीनिर्मितीसाठी ओळखली जातात. महाराष्ट्रात मुंबईतील मोहम्मद अली रोड आणि मालेगाव येथे मोठ्या प्रमाणात टोप्यांचे बाजार भरतात. ३० रुपयांपासून १,२०० रुपयांपर्यंत टोप्यांचे दर आहेत. विशेषतः हॅण्डमेड आणि भरतकाम केलेल्या टोप्यांना अधिक मागणी आहे.

नाशिकमध्ये खरेदीला वेग

सध्या रमजान महिन्यामुळे जुन्या नाशिकमधील दूध बाजार चौक मंडई, बागवानपुरा आणि आयशा मशीद परिसरात टोपी खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. विविध डिझाइन, रंग आणि स्टाइलमुळे बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

परंपरेला ट्रेंडची जोड

आज टोपी ही केवळ धार्मिक परंपरेपुरती मर्यादित नसून, ती फॅशन स्टेटमेंट झाली आहे. श्रद्धा, संस्कृती आणि आधुनिक डिझाइन यांचा संगम असलेली 'टोपी संस्कृती' रमजानमध्ये पुन्हा एकदा रंगात आली आहे.

लहान मुलांसाठी 'अर्तागुल' स्टाइल टोपीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.
-मोहसीन अत्तार, टोपीविक्रेता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT