जुने नाशिक : शहरातील धार्मिक स्थळांवरील अनाधिकृत भोंगे हटविले जाणार असून, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, सर्व पोलिस ठाण्यांमध्ये समन्वय बैठका घेतल्या जात आहेत. याबाबतची नुकतीच बैठक भद्रकाली पोलिस ठाण्यामध्ये पार पडली.
बैठकीस वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश चौधरी, निरीक्षक मनोहर कारंडे यांनी मुस्लिम धार्मिक नेत्यांसोबत बैठक घेत, त्यांना याबाबतची माहिती दिली. बैठकीस शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन खतीब यांच्यासह सर्व मशिदींचे मौलाना, विश्वस्त आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत परवाने, अनधिकृत वापर आणि वापरकर्त्यांना येणाऱ्या कायदेशीर समस्या यासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली. परवानगीशिवाय धार्मिक स्थळांवर भोंगे वाजवणे कायदेशीररित्या चुकीचे आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच बेकायदेशीरपणे भोंगे वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही पोलिसांनी याप्रसंगी दिला.
दरम्यान, यासंदर्भात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाणार असल्याचे हाफिज हिसामुद्दीन खतीब यांनी सांगितले. बैठकीत मुफ्ती मेहबूब आलम, मौलाना शरीफ सय्यद, मौलाना फय्याज बरकती वसीम पीरजादे, इजाज रजा, जाकीर हाजी युनूस शेट, शौकत मीर सय्यद, जुबेर जहागीरदार महजार खान यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते.
कुठल्याही प्रार्थनास्थळावर विनापरवानगी भोंगे लावल्यास ते जप्त केले जातील. भोंगे रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत. तसेच सकाळी ६ ते रात्री १० या काळात सकाळी ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या नियमांचे सर्वांनाच पालन करावे लागणार आहेत.