Janori Kumbh Mela 2026 Pudhari News Network
नाशिक

Kumbh Mela logo controversy- बोधचिन्ह अनावरणाच्या आनंदात मीठाचा खडा!

Kumbh Mela logo controversy- वैष्णवांना डावलल्याची भावना : साधू-महंतांकडून नाराजीचा सूर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : कुंभमेळ्याचे महत्व अधोरेखित करणाऱ्या बोधचिन्हाचे बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अनावरण झाल्यानंतर काही वेळातच या बोधचिन्हाला वैष्णवपंथीयांनी आक्षेप घेतल्याने कुंभमेळ्यात शैव व वैष्णवपंथीयांत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वैष्णव साधू-महंतांनी कुंभमेळ्याच्या बोधचिन्हातून समुद्रमंथनाचा मूळ अर्थच गायब केल्याचे म्हटले आहे. बोधचिन्हावरील आक्षेपामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

बोधचिन्हासाठी प्राधिकरणाने देशपातळीवर स्पर्धेचे आयोजन करत उत्कृष्ट धार्मिक महत्त्व अधोरेखित करणाऱ्या बोधचिन्हाचे अनावरण थाटात झाले. मात्र, काही वेळेतच वैष्णवपंथीयांनी आक्षेप घेतला. शैवपंथीयांच्या चालीरीती, परंपरा वेगळी व वैष्णवपंथीयांची स्वतःची ओळख आहे. शाहीपर्वणीच्या तारखादेखील काहीशा वेगळ्या असतात. नाशिकच्या कुंभात स्नानासाठी शैव येत नाहीत. त्र्यंबकेश्वरला वैष्णव जात नाही. मात्र, या वादावर पडदा टाकण्यासाठी यंदा पहिल्यांदाच प्रशासनाने नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा या नावाने प्रसार व प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. आता बोधचिन्हामुळे पुन्हा वादाला तोंड फुटले आहे.

याला आहे आक्षेप

नाशिक-त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने निवड केलेल्या बोधचिन्हात कलशातून अमृताचे थेंब झरताना दाखवण्याऐवजी त्रिशूळ बाहेर येताना दाखवला आहे. ही पौराणिक विसंगती असल्याचे साधू-महंतांचे म्हणणे आहे. कलश हे अमृत आणि पाक्रित्र्याचे प्रतीक आहे. त्रिशूळ हे संहाराचे प्रतीक मानले जाते. नाशिकमध्ये वैष्णव आखाड्यांचे वर्चस्व आणि परंपरा असताना बोधचिन्हात भगवान विष्णूंचे सुदर्शन चक्र किंवा वैष्णव परंपरेला कोणतेही स्थान देण्यात आले नसल्याने वैष्णव पंथाने आक्षेप घेतला आहे.

काय आहे बोधचिन्हात

बोधचिन्ह नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या पवित्र भूगोल आणि धार्मिक परंपरांवर आधारित असल्याचा दावा केला आहे. भगवान शंकराचे त्रिशूळ दर्शवून आध्यात्मिक ऊर्जेचे प्रतीक असल्याचे दर्शवण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराची प्रतिकृती, काळाराम मंदिराची कमान आणि गोदावरी नदीला शिवलिंगाच्या रूपात दर्शवण्यात आले आहे. बोधचिन्हातून गोदाघाट, स्मारके, मंदिरे, त्र्यंबकचा ब्रहागिरी पर्वत, गोदावरी संगम आणि साधू-संतांच्या मेळ्याचे प्रतिबिंब असावे, असे स्पर्धेच्या नियम व अटींत उल्लेख होता. मात्र, देशभरातून पाठवलेल्या स्पर्धकांमधून जो लोगो निवडण्यात आला त्या बोधचिन्हात यापैकी एकही गोष्ट दिसत नसल्याची तक्रार आहे.

बोधिचिन्हात भगवान शंकराच्या त्रिशूल सोबत श्रीरामांचा धनुष्यबाण हवा होता. बोधचिन्हात सुधारणा करू, असे आश्वासन कुंभमेळा आयुक्तांनी दिले आहे.

- महंत भक्तिचरणदास महाराज

कुंभमेळ्याचे अनावरण करण्यात आलेल्या बोधचिन्हात खूप उणिवा आहेत. वैष्णव पंथ, नाशिकचे प्रतिबिंब यामध्ये कुठेही दिसत नाही.

- महंत सुधीरदास पुजारी

स्पर्धेत देशभरातून स्पर्धक सहभागी झाले होते. त्याची निवड सर्वानुमते केली. प्रत्येकाचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो.

- शेखर सिंह, आयुक्त, कुंभमेळा प्राधिकरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT