No NOTA Option; Wrong Voting Order May Invalidate Ballot file photo
नाशिक

नोटाचा पर्याय गायब, क्रम ओलांडल्यास तर मतपत्रिका कचऱ्यात!

No NOTA Option; Wrong Voting Order May Invalidate Ballot-विधान परिषद निवडणूक: जिल्हा प्रशासन सज्ज; टाय झाला, तर चिठ्ठी ठरणार किंगमेकर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत व्हीएम मशीनवर असलेला नोटाचा पर्याय विधान परिषदेच्या निवडणुकीत आता नसणार आहे. नवीन नियमानुसार मतदारांना नोटाचा पर्याय उपलब्ध असणार नाही. मतदारांना रिंगणातील उमेदवारांपैकीच पसंतीक्रमानुसार मतदान करावे लागेल. मतदान करताना मतदाराने पहिला क्रम दिल्यानंतर पुढची दोन्ही मते दिली नाहीत, तरीही त्याचे पहिले मत ग्राह्य धरले जाईल, मात्र, मतदाराने पहिले आणि थेट तिसरे (दुसरा क्रम न देता) असे मतदान केले, तर ती मतपत्रिका बाद ठरविली जाणार आहे.

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. माघारी प्रक्रिया झाल्यानंतर निवडणुकीतील मतदान प्रक्रिया ही पारदर्शक, निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे आणि गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी विशेष भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. यंदा मतपत्रिकेवर मतदारांना नोटाचा पर्याय उपलब्ध नसणार असल्याचे सांगत त्यांनी, या संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी विशेष भरारी पथकांची नियुक्ती केले असल्याचेही सांगितले.

अशी असेल, मतपत्रिकेची रचना

जिल्हाधिकाऱ्यांनी मतपत्रिकेवरील उमेदवारांच्या नावांच्या क्रमाविषयी स्पष्टता दिली असून, यात मतपत्रिकेवर सर्वप्रथम नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या उमेदवारांना स्थान दिले जाईल, त्यानंतर संबंधित उमेदवारांच्या नावांच्या इंग्रजी वर्णक्रमानुसार नावे छापली जातील, अपक्ष उमेदवारांची नावे नियमानुसार स्वतंत्रपणे खाली समाविष्ट केली जातील, असे आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले.

समान मते पडल्यास चिठ्ठीच किंगमेकर !

जर मतमोजणीदरम्यान दोन प्रमुख उमेदवारांमध्ये टाय (समान मते) अशी परिस्थिती निर्माण झाली, तर विजेता ठरविण्यासाठी रंजक नियम लागू होईल. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, अशा वेळी चिठ्ठी टाकून (लकी ड्रॉ) विजेता निश्चित केला जाईल. ज्या उमेदवाराच्या नावाची चिठ्ठी निघेल, त्याला विजयी घोषित केले जाईल.

विधान परिषद निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निष्पक्ष आणि कायद्यानुसार पार पाडण्यासाठी प्राधान्यक्रमानुसार मतदानाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. सर्व संबंधित घटकांनी निवडणूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे
- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT