नाशिक : एकीकडे महापालिकेच्या अनेक शाळा इमारती खासगी शिक्षण संस्थांना भाडेतत्वावर दिल्या जात असताना अतिरीक्त वर्गखोल्यांसाठी पोर्टा कॅबिन खरेदीचा प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार केला आहे. वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी लागणारा मोठा कालावधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा ठरू नये यासाठी पोर्टा कॅबिनमध्ये वर्ग भरविण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी मिता चौधरी यांनी दिली आहे.
महापालिकेच्या २७ आरोग्यवर्धिनी केंद्रांसाठी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे आरोग्यवर्धिनी केंद्रांकरीता पोर्टा कॅबिन खरेदीचा निर्णय वैद्यकीय विभागाने घेतला आहे. एका पोर्टा कॅबिनसाठी सुमारे १५ ते २० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. त्या धर्तीवर अतिरीक्त वर्गखोल्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी पोर्टा कॅबिनची खरेदी करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार केला आहे. महापालिकेच्या दहा ते बारा शाळांमध्ये वाढत्या पटसंख्येमुळे अतिरीक्त वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी वर्गखोल्या बांधकामाचा प्रस्ताव शिक्षण विभागाने बांधकाम विभागाकडे पाठविला आहे. मात्र या वर्गखोल्यांच्या बांधकामांसाठी किमान वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती असल्याने अतिरीक्त वर्गखोल्यांसाठी वैद्यकीय विभागाच्या धर्तीवर सुमारे २५ 'पोर्टा कॅबिन'ची खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. वर्गखोल्यांचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर या पोर्टा कॅबिनचा वापर प्रयोगशाळा, वाचनालय, प्रदर्शन केंद्र आदी कामांसाठी केला जाईल, अशी माहिती प्रशासनाधिकारी मिता चौधरी यांनी दिली.
खासगी शाळांच्या धर्तीवर महापालिकेच्या शाळांमध्ये 'रेड हाऊस' आणि 'ग्रीन हाऊस' संकल्पना राबविली जाणार आहे. शाळेत विविध स्पर्धा, कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी 'सीएसआर'चे साहाय्य घेतले जाईल,असे चौधरी यांनी सांगितले.
अतिरीक्त वर्गखोल्यांच्या बांधकामाला लागणारा मोठा कालावधी लक्षात घेता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी वर्गखोल्यांसाठी पोर्टा कॅबिनची खरेदी करण्याचा विचार आहे. आयुक्तांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल.मिता चौधरी, प्रशासनाधिकारी, शिक्षण विभाग.