नाशिक : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यांनी जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन थीम जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयातर्फे २२ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत देशभरात जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबविली जात आहे.
प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन थीमवर आधारीत प्लास्टीक जनजागृतीसाठी विशेष मोहिमेसाठी नाशिक महापालिकेतर्फे समाजमाध्यमांचाही सहभागी करून घेतले जात असून, यासंदर्भात समाजमाध्यमांच्या प्रसारकांसमवेत चर्चासत्र नुकतचे पार पडले.
महापालिकेच्या राजीव गांधी भवनातील स्थायी समितीच्या सभागृहात प्रभारी आयुक्त तथा प्रशासक करिश्मा नायर यांच्या उपस्थितीत हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी महापालिकेमार्फत पर्यावरणसंदर्भात होणाऱ्या विविध कार्यक्रमांबाबत नायर यांनी माझी वसुंधरा अभियान, कचरा विलगीकरण, पर्यावरणपूरक सण साजरे करणे, ईव्ही चार्जिंग स्टेशन्स, सिंगल युज प्लास्टिकचा वापरावरील बंदी याविषयी समाजमाध्यमांवर प्रसारकांनी त्यांच्या रील्सद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीप्रसंगी शंभरहून अधिक समाजमाध्यम प्रसारकांची उपस्थिती होती. या प्रसारकांनी आगामी कुंभमेळ्याबाबत नवीन संकल्पना मांडल्या. या चर्चासत्रात उपायुक्त (प्रशासन) लक्ष्मीकांत साताळकर, उपायुक्त (कर) अजित निकत, उपायुक्त (पर्यावरण) नितीन पवार, कार्यकारी अभियंता (पर्यावरण) राजेंद्र शिंदे, राहुल बोबे (केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ) आदी उपस्थित होते.