

नाशिक : शहर 'प्लास्टिक फ्री' करण्याचा निर्धार महापालिकेच्या आयुक्त डॉ. मनीषा खत्री यांनी केला आहे. केंद्रीय पर्यावरण विभागाच्या निर्देशांनुसार एकल वापर अर्थात 'सिंगल यूज' प्लास्टिकचा वापर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक शहरात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरात प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची विक्री, वापर व साठा करणाऱ्या ७५३ जणांविरोधात महापालिकेने कारवाई केली असून, तब्बल ३८ लाख २५ हजारांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अजित निकत यांनी दिली आहे.
एकल वापर (सिंगल यूज) प्लास्टिक कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्या व त्यामुळे सार्वजनिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असतो. त्या अनुषंगाने केंद्रीय पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या निर्देशांनुसार एकल प्लास्टिकचा वापर, विक्री व साठ्यावर बंदी घालण्यात आली आहे. एकल प्लास्टिकचा वापर, विक्री व साठा करणाऱ्यांविरोधात घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत एप्रिल २०२४ ते एप्रिल २०२५ या 13 महिन्यांच्या कालावधीत तब्बल ७५३ जणांवर कारवाई करून ३८ लाख २५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच संबंधितांकडून ४,५२० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. जानेवारीत १,०५०, तर फेब्रुवारीत सर्वाधिक १,४१३ किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. सहाही प्रशासकीय विभागांतील विभागीय स्वच्छता निरीक्षक तसेच स्वच्छता निरीक्षकांच्या पथकामार्फत ही मोहीम राबविण्यात आली.
नाशिक शहर हे 'प्लास्टिक फ्री' करण्याचे ध्येय महापालिकेने समोर ठेवले आहे. त्यानुसार केवळ दंडात्मक कारवाईवर भर न देता किंबहुना दंड आकारणी करणे हा प्राथमिक उद्देश न ठेवता नाशिक शहरात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर होणार नाही, याकरिता दि. २२ मे ते ५ जून या दरम्यान विशेष जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या निर्देशांनुसार दि. २२ मे ते ५ जून या कालावधीत प्लास्टिक मुक्तीसाठी देशभरात विशेष जनजागृती मोहीम राबविली जात आहे. नागरिकांनी पर्यावरण रक्षणासाठी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळून प्लास्टिक फ्री मोहिमेत सहभागी व्हावे.
अजित निकत, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन, नाशिक.