नाशिक महानगरपालिका  file photo
नाशिक

NMC News | महापालिकेची 'अर्थ'कोंडी! देयक वाटपच रखडले, कशी होणार पाणीपट्टी वसुली?

पुढारी वृत्तसेवा
नाशिक : आसिफ सय्यद

एकीकडे घरपट्टीच्या थकबाकीचा डोंगर वाढत असताना दुसरीकडे पाणीपट्टीच्या देयकांचे वाटपच रखडल्याने पाणीपट्टी भरण्याकडे करदात्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे गेल्या पाच महिन्यात पाणीपट्टीतून जेमतेम १३.८७ कोटींचा महसुल जमा होऊ शकला असून पाणीपट्टीची थकबाकी तब्बल १२७.५५ कोटींवर पोहोचली आहे.

नाशिक शहरात महापालिकेच्या माध्यमातून घरोघरी पाणीपुरवठा केला जातो. विहित शुल्क भरून नळकनेक्शन दिले जाते. शहरात एकूण २ लाख ११ हजार ७६ नळ कनेक्शनधारक असून वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात नळकनेक्शन धारकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. घरपट्टी वसुलीसाठी सवलत योजना, अभय योजना राबविणाऱ्या कर विभागाने पाणीपट्टी वसुलीकडे मात्र तितकेसे लक्ष दिलेले नाही. किंबहुना पाणीपट्टी वसुलीची जबाबादरी पाणीपुरवठा विभागाकडे की, कर वसुली विभागाकडे यातच बरीच वर्षे टोलवाटोलवी सुरू राहिल्याने पाणीपट्टी वसुलीला दिशा लाभू शकलेली नाही. दर तीन महिन्यांनी पाणीपुरवठ्याची देयके नळकनेक्शन धारकांना वाटप करण्याची महापालिकेच्या कर वसुली विभागाची जबाबदारी आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून पाणीपट्टीच्या देयकांचे वाटपच होऊ शकलेले नाही. कर वसुली विभागातील कर्मचाऱ्यांवर टाकण्यात आलेली निवडणूक कामाची जबाबदारी यामागील प्रमुख कारण असले तरी वाढत्या थकबाकीमुळे पाणीपुरवठा यंत्रणेतील तोटा वाढत आहे. घरपट्टीच्या धर्तीवर पाणीपट्टी देयक वाटपाचेही खासगीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असला तरी पाणीपट्टीच्या थकबाकीची वसुली कशी होणार हा प्रश्न प्रशासनाला भेडसावतो आहे.

पंचवटीत सर्वाधिक थकबाकी

पंचवटी विभागात नळ कनेक्शनधारकांकडे सर्वाधिक २९.९५ कोटींची पाणीपट्टी थकीत आहे. त्याखालोखाल थकबाकीदारांमध्ये सिडकोचा दुसरा क्रमांक असून या विभागातील नळ कनेक्शनधारकांकडे २८.२२ कोटींची पाणीपट्टी थकीत आहे. नाशिकरोडला २८.०२, नाशिक पूर्व २५.८१, सातपूर १८.८८ तर नाशिक पश्चिम विभागात १०.५१ कोटींची पाणीपट्टी थकीत आहे.

विभागनिहाय पाणीपट्टी वसुली व थकबाकी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT