नाशिक : बिंदूनामावलीला शासनाने मंजुरी दिल्यानंतर महापालिकेतील नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला असून, पहिल्या टप्प्यात होणारी स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत, तसेच वाहतूक विभागातील १४० अभियंत्यांची भरतीप्रक्रिया 'टीसीएस'मार्फत राबविली जाणार आहे. यासाठी येत्या महिनाभरात अर्ज मागविले जाणार असून, ऑनलाइन परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने नाशिकसह आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांतील नोकरभरती संदर्भातील पेसा कायद्यानुसार सुधारित बिंदुनामावलीला मंजुरी दिली आहे. नाशिक जिल्ह्यासाठी अनुसूचित जमातीसाठी २२ टक्के आरक्षण मंजूर करण्यात आल्यामुळे महापालिकेच्या नोकरभरतीला हिरवा कंदील मिळाला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी सदरची पदे भरणे अत्यावश्यक असल्यामुळे महापालिकेने तातडीने भरतीसाठी पावले उचलली आहेत. नोकरभरती प्रक्रिया राबविण्यासाठी महापालिकेने यापूर्वीच टीसीएस कंपनीसोबत करार केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी मंजूर केलेल्या वैद्यकीय, आरोग्य तसेच अग्निशमन विभागातील ७०६ पदांची भरतीप्रक्रिया टीसीएसमार्फतच राबविली जाणार होती. परंतु, यासाठी डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत दिलेली आस्थापना खर्च शिथिलतेची मुदत संपुष्टात आल्याने ही प्रक्रिया रखडली. त्यानंतर शासनाने महापालिकेतील तांत्रिक संवर्गातील १४० अभियंत्यांच्या भरतीला मंजुरी दिली. परंतु, बिंदुनामावली मंजूर नसल्यामुळे ही भरती देखील रखडली होती. अखेर शासनाने बिंदूनामावलीचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर पहिल्या टप्प्यात अभियंत्यांची १४० पदे भरली जाणार आहेत. टीसीएसमार्फतच ही भरतीप्रक्रिया राबविली जाणार आहे. लवकरच यासंदर्भातील प्रस्ताव टीसीएसला पाठविला जाणार असून महिनाभरात अर्जप्रक्रिया राबविली जाईल, अशी माहिती प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली.
शासनाच्या निर्देशानुसार, वरिष्ठ पदांची भरती मुलाखतीऐवजी ऑनलाइन परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे. यानुसार, अभियंता पदासाठीची भरतीप्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) यांच्या माध्यमातून ऑनलाइन परीक्षेद्वारे राबवली जाईल. या परीक्षेचा निकाल घोषित केल्यानंतर उमेदवारांची निवडयादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
भरतीप्रक्रिया सुरू करण्यापूर्वी बिंदुनामावलीचा प्रस्ताव तपासणीसाठी पुन्हा विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविला जाणार आहे. भरतीसाठी राखीव जागांची निश्चित केली जाणार असून, त्यानुसार भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. भरतीप्रक्रिया निर्वेध पार पडावी यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत.