नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेतील बदल्यांमध्ये बाह्यशक्तींचा हस्तक्षेप वाढला असून नगररचना, बांधकाम यासारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये बदल्यांसाठी 'अर्थ'कारण रंगल्याची चर्चा आहे. विशिष्ट व्यक्तींकडून अधिकाऱ्यांना फोनवर संपर्क साधला जात असून, इच्छित ठिकाणी बदली हवी असल्यास भेटा, असा संदेश दिला जात आहे. नगररचना विभागात नुकतीच झालेली एका उपअभियंत्याची बदली या अर्थकारणाचाच परिणाम असल्याचे समजते. दरम्यान, यासंदर्भात प्रशासन उपायुक्तांशी संपर्क साधला असता त्यांनी कानावर हात ठेवले.
तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ एका विभागात कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची अन्य विभागात बदली करणे हा शासन नियम आहे. मात्र, या शासन नियमाला अलीकडच्या काळात महापालिकेत हरताळ फासला गेल्याचे समोर आले आहे. काही अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत आहेत. तर काही अधिकारी, कर्मचाऱ्यांची एक अथवा दोन वर्षांतच अन्य विभागात बदली केली जात असल्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे. यावर कर्मचारी-कामगार संघटनादेखील मूग गिळून गप्प असल्याने बदलीसाठी 'राम' म्हणण्याची वेळ महापालिकेतील 'राव'साहेबांवर आली आहे. दोन दिवसांत महापालिकेचे अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे. एकीकडे उत्पन्न वाढविण्याचे आव्हान आहे. पंधराव्या वित्त आयोगाचा निधी हवा असेल तर उत्पन्न वाढविणे बंधनकारक आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी कर्मचारी, कामगारवर्गाला विश्वासात घेणे आवश्यक आहे. असे असताना बदल्यांच्या माध्यमातून अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्येच वाद निर्माण झाल्याने त्याचा परिणाम उत्पन्नवाढीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शासनाकडे तक्रार करणार
महापालिकेत अर्थकारणातून केल्या जाणाऱ्या बेकायदेशीर बदल्यांविरोधात शासनाकडे तक्रार करण्याची भूमिका काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. प्रशासकीय राजवटीचा गैरफायदा घेत सुरू असलेल्या या प्रकाराबाबत कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
ठेक्यांमध्ये हस्तक्षेप
महापालिकेत यापूर्वी वादग्रस्त ठेकेदार म्हणून ख्याती असलेल्या बाह्यशक्ती कार्यरत झाल्या असून, महापालिकेचा सर्वोच्च अधिकारी आपला नातेवाईक असल्याचे सांगत काही कामकाज असेल तर मला सांगा, असा थेट निरोप संबंधिताकडून दिला जात आहे. केवळ बदल्याच नव्हे तर विविध कामांच्या ठेक्यांमध्येही हा हस्तक्षेप सुरू असल्याची चर्चा आहे.