नाशिक

NMC Nashik | घर देता का रे? घर? सिग्नवरील भिकारी आले मनपाच्या दारात

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील सिग्नलवरील भिकाऱ्यांसह फुले तसेच विविध वस्तू विक्रेत्यांवर केलेली कारवाई महापालिकेच्या चांगलीच अंगलट आली आहे. महापालिकेने बेघर निवारागृहात रवानगी केल्याने संतप्त झालेल्या या भिकारी तसेच विक्रेत्यांनी महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनसमोर गुरुवारी (दि.१५) सहकुटुंब आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदविला. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पालिकेच्या सुरक्षारक्षकांसह पोलिसांचीही चांगलीच धावपळ उडाली.

भिकारी तसेच बेघरांसाठी महापालिकेने शहरात बेघर निवारा केंद्र उभारले आहेत. नाशिकरोड रेल्वे स्टेशन, बसस्टॅन्ड, पंचवटीत रामकुंड, तपोवनासह शहरातील सिग्नलवर मोठ्या प्रमाणावर भिकारी तसेच फूल व विविध वस्तू विक्री करताना लहान मुले, महिला आढळून येतात. यामध्ये मराठवाडा, विदर्भमधून आलेल्या कुटुंबाची संख्या अधिक आहे. यातील काहीजण सिग्नलवर गजरे तसेच किरकोळ साहित्य विक्री करतात. मात्र, त्यातीलच काही लहान मुले आणि महिला भीक मागताना दिसून येतात. राहण्यासाठी अनेकांनी वाहतूक बेट, उड्डाणपुलाच्या खाली तसेच मोकळ्या जागेत आपले बस्तान बसवले आहे. त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. या भिकाऱ्यांना सिग्नल, दुभाजकांवरून हटवून त्यांचे पालिकेकडून पुनर्वसन केले जात आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अशाच भिकाऱ्यांसह फूल विक्रेत्यांना मुंबई नाका सिग्नलवरून उचलत, त्यांना टाकळी रोड येथील पुनर्वसन केंद्रात पाठवले. परंतु,पालिकेच्या या कारवाईमुळे संतप्त झालेल्या साहित्य विक्रेत्यांसह, भिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.१५) थेट महापालिका मुख्यालय गाठत घोषणाबाजी सुरू केली. 'एकतर वस्तूंची विक्री करू द्या, अन्यथा आम्हाला घरे द्या' अशी मागणी करत या भिकाऱ्यांनी पालिकेच्या कारवाईला विरोध दर्शविला.

विनापरवाना आंदोलनावर कारवाई नाही
अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पालिकेच्या सुरक्षारक्षकांसह पोलिसांची धावपळ उडाल्याचे चित्र होते. कोणतीही परवानगी न घेता हे आंदोलन करण्यात आले होते. परंतु आंदोलनात सहभागी लहान मुले, महिलांना बघितल्यानंतर पोलिसांनी कुठलीही कारवाई न करताच त्यांना सोडून दिले.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT