महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी गोदाघाट, रामकुंड तसेच सिंहस्थ मार्गाची पाहणी केली (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

NMC Commissioner | भल्या पहाटे आयुक्तांचा ताफा गोदाघाटावर

Nashik-Trimbakeshwar Simhastha : विकासाची चाहूल : घाट परिसर, सिंहस्थ मार्गाची पाहणी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी गोदाघाट, रामकुंड तसेच सिंहस्थ मार्गाची पाहणी केली. भल्या पहाटे अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह गोदाघाटावर पोहोचलेल्या आयुक्तांना बघून नाशिककरांना विकासाची चाहूल लागली.

आगामी सिंहस्थ कुंभमेळा, रामकाल पथ, नमामि गोदा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त खत्री यांनी शनिवारी (दि. 28) पंचवटी परिसराची पाहणी केली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. आवेश पलोड, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे आदींसह अधिकारी या पाहणीत सहभागी झाले होते.

या ठिकाणी केली पाहणी...

शाश्वत पर्यटनाच्या अनुषंगाने पर्यटकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने गोदावरी नदीकाठ परिसर, अहिल्याबाई होळकर पुलाखालील पायऱ्या, वस्त्रांतरगृह, रामकुंड परिसर, अहिल्याबाई होळकर पुलापासून ते गाडगे महाराज पुलापावेतोचा नदीकाठ व नदीचा परिसर, पंचवृक्ष परिसर, सीतागुंफा परिसर, काळाराम मंदिर व त्यालगतचा शाही मार्ग परिसर त्याचप्रमाणे श्रीराम उद्यानापासून ते रामकुंडा पावेतोचा रस्ता आदी ठिकाणांची पाहणी आयुक्तांनी केली. या पाहणी दरम्यान आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी या परिसराचा विकास करण्याच्या दृष्टीने सूचना केल्या.

'रामकाल-पथ' प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने कार्यान्वित करण्याकामी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सूचना दिल्या.

नाशिकचा 'आयकॉनिक पर्यटन स्थळ' म्हणून विकास

नाशिक शहरातील या परिसराचा जागतिक स्तरावर 'आयकॉनिक पर्यटन स्थळ' म्हणून विकास व्हावा यासाठी केंद्र शासनामार्फत मंजूर प्रकल्पांत करण्यात येणारी कामे त्याद्वारे स्थानिक अर्थव्यवस्थेची वाढ व शाश्वत पर्यटन हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश साध्य होणार असल्याने शाश्वत पर्यटनाचे पालन करून त्याचा एकूण अनुभव पर्यटकांना देण्याचा प्रयत्न करण्यासाठी 'रामकाल-पथ' प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने कार्यान्वित करण्याकामी सूचना दिल्या.

'राम काल पथ' प्रकल्पाला चालना

'राम काल पथ' प्रकल्पांतर्गत विविध सुविधायुक्त कामे, लेझर शो, पाण्याचे कारंजे- फवारे, बोटिंग, तात्पुरते वस्त्रांतरगृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, पार्किंग सुविधा, नो- व्हेईकल झोन, नो- प्लास्टिक झोन त्याचप्रमाणे रामकुंड येथे स्नानासाठी योग्य पाण्याचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने कामाची उभारणी करण्याचे तसेच रामायणातील विविध प्रसंग, म्युरल्स, पुतळे, भित्तिचित्रे, कमानी, दीपस्तंभ व आकर्षक वि्द्युत रोषणाई यांद्वारे संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेण्यासाठी आयुक्तांनी सूचना दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT