निफाड : काही दिवस कमी झालेल्या थंडीचा जोर पुन्हा वाढला असून, निफाडला शुक्रवारी (दि.9) हंगामातील नीचांकी 6.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्राने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या पाच दिवसांत तापमानात 8 अंशांची घसरण झाली, तर नाशिकचे तापमान 9.1 इतके घसरल्याने नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरली आहे.
निफाडला 5 जानेवारी रोजी किमान तापमान 14 अंश होते. त्यात शुक्रवारी घसरण होऊन 6.1 अंशांवर आले. विशेष म्हणजे, पहाटेच्या वेळी हवेतील आर्द्रता 98 टक्क्यांपर्यंत पोहोचत असल्याने दाट धुके आणि दवाचा प्रभाव वाढला आहे. सध्याच्या कोरड्या व थंड हवामानामुळे थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे.
ही थंडी गहू आणि हरभरा पिकांसाठी वरदान ठरत असली, तरी द्राक्षबागायतदारांची चिंता वाढली आहे. पारा 7 अंशांच्या खाली गेल्याने द्राक्षमण्यांची फुगवण थांबणे आणि भुरी रोगाचा धोका वाढला आहे. दुसरीकडे, तापमानातील या चढ-उतारामुळे सर्दी, खोकला आणि सांधेदुखीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. शेतकरी सध्या बागा वाचवण्यासाठी पहाटे शेतात धूर करून ऊब निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.