निफाड : पुढारी वृत्तसेवा
शासन रस्ते विकासासाठी कोट्यवधींच्या निधीची घोषणा करते. पण, प्रत्यक्ष अंमलबजावणीत किती निष्काळजीपणा असतो याचे जिवंत उदाहरण निफाड-चांदवड (जिल्हा महामार्ग-६४) रस्त्यावर पाहायला मिळत आहे. सुमारे ८० कोटी ७५ लाख रुपये खर्चुन तयार करण्यात आलेल्या या रस्त्याला गेल्या वर्षभरापासून मोठ्या भेगा पडल्या असून, रस्ता खचू लागला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार कुंभकर्णी झोपेत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याचे काम 'हायब्रिड अॅन्युइटी' अंतर्गत एबीबी इन्फ्रा बिल्डकॉन प्रा. लिमिटेड या कंपनीने केले आहे. मार्च २०२१ पासून मार्च २०३१ पर्यंत म्हणजेच १० वर्षांपर्यंत या रस्त्याची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे.
तरीही गेल्या १२ महिन्यांपासून रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्या आहेत. पृष्ठभाग उखडला आहे. रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे. रात्रीच्या वेळी या भेगांचा अंदाज न आल्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून अपघात झाले आहेत. ८० कोटी खर्चुनही जर जनतेला खराब रस्त्यावरून प्रवास करावा लागत असेल तर हा निधी गेला कुठे, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. करारानुसार ठेकेदाराने या भेगा तातडीने भरणे बंधनकारक आहे.
मात्र, वर्ष उलटले तरी दुरुस्तीचे साधे कामही झालेले नाही. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे आणि ठेकेदाराचे साटेलोटे आहे का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. देखभाल दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधीची तरतूद असतानाही काम का रखडले आहे, याचे उत्तर नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाला द्यावे लागणार आहे. जर येत्या काही दिवसांत रस्ता सुस्थितीत करून बुजवलेले गटारे पुन्हा बांधले नाही तर बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा आणि रास्ता रोको करण्याचा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.
अर्धवट गटारांचे बांधकाम माती टाकून बुजवले
रस्त्याच्या कामातील सर्वात मोठा धक्कादायक प्रकार म्हणजे गटारांची दुरवस्था. रस्ता बांधणीच्या वेळी ठेकेदाराने दोन्ही बाजूंनी गटारांचे अर्धवट बांधकाम केले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच हे बांधलेले गटारे पुन्हा माती टाकून बुजवून टाकण्यात आले. चार वर्षे उलटली तरी या गटारांची कामे पूर्ण झालेली नाहीत. पाण्याचा निचरा होत नसल्याने रस्त्याचे अधिक नुकसान होत आहे.