नाशिक : बहुचर्चित टीसीएस प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्या जामीन अर्जावर येत्या २५ जून रोजी अंतिम निर्णय दिला जाणार आहे. शुक्रवारी (दि. १९) न्यायालयात सरकारी पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायालयाने निकाल राखून ठेवला. त्यामुळे निदा खानसह तौसिफ अत्तार आणि दानिश शेख या तिन्ही संशयितांच्या जामीन अर्जाबाबत आता सर्वांचे लक्ष २५ जूनच्या सुनावणीकडे लागले आहे.
या प्रकरणात गेल्या १३ जून रोजी संशयित आरोपींच्या वकिलांनी जामिनासाठी सविस्तर युक्तिवाद केला होता. त्यानंतर न्यायालयाने सरकारी पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि. १९)
अॅड. गायकवाड यांनी सरकारी पक्षातर्फे न्यायालयासमोर आपली भूमिका स्पष्ट करीत, आरोपींना जामीन देण्यास विरोध दर्शविला. यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्याने न्यायालयाने निर्णय राखून ठेवत पुढील सुनावणीची तारीख २५ जून निश्चित केली. न्यायालयाने यापूर्वी संशयितांच्या वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आज सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि मांडणीही सविस्तरपणे ऐकून घेतली. दोन्ही बाजूंचे मुद्दे विचारात घेतल्यानंतर न्यायालयाने तत्काळ निर्णय न देता तो राखून ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या प्रकरणात न्यायालय नेमका कोणता निर्णय देते, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, पुढील सुनावणीपर्यंत निदा खान, तौसिफ अत्तार आणि दानिश शेख यांना न्यायालयीन कोठडीतच राहावे लागणार आहे. २५ जून रोजी होणाऱ्या सुनावणीत न्यायालयाकडून जामीन मंजूर होणार की अर्ज फेटाळले जाणार, याकडे लक्ष लागले आहे.