Sinnar Concrete Road Damage Pudhari Photo
नाशिक

Sinnar Concrete Road Damage | आडवा फाटा-खासदार पूल काँक्रीट रस्ता खचला

Sinnar Concrete Road Damage | सरस्वती नदीलगत पडले भगदाड; नागरिकांकडून संताप व्यक्त

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

आडवा फाटा ते खासदार पूल दरम्यान नुकतेच सुरू असलेल्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाळा पूर्णपणे सुरू होण्यापूर्वीच काम सुरू असलेल्या रस्त्याचा काही भाग खचण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः सरस्वती नदीलगतच्या बाजूने रस्त्याला भगदाड पडून तो खचल्याचे दिसून येत आहे.

रस्त्याच्या अगदी कडेला ही घटना घडली असली तरी त्या भागातून वाहनांची वर्दळ तुलनेने कमी असते. त्यामुळे एवढ्या कमी वापराच्या भागातही रस्ता खचल्याने कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.

दरम्यान, संबंधित कंत्राटदार व प्रशासन यावर कोणती उपाययोजना करणार, केवळ तात्पुरती डागडुजी केली जाणार की कायमस्वरूपी दुरुस्ती केली जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. रस्त्याची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक व वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

'नदी स्वच्छतेसाठी उतरवलेल्या पोकलेनमुळे रस्त्याचे नुकसान'

रस्त्याचे काम करताना या भागातील अतिक्रमण काढले होते. नदीच्या बाजूने भक्कम भराव नाही. अशातच काँक्रिटीकरणानंतर पंधरा दिवसांतच सरस्वती नदी स्वच्छतेच्या कामासाठी पोकलेन मशीन त्यावरून उतरवण्यात आले. परिणामी, रस्त्याचे नुकसान झाले असा दावा नगर परिषदेचे बांधकाम विभागाचे अभियंता सौरभ गायकवाड यांनी केला आहे. येथे पुन्हा काँक्रिटीकरण करण्यात येईल. तसेच नगर परिषदेत ठराव करून नपा फंडातून रस्त्यालगत भिंत बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

काँक्रिटीकरण दर्जावर प्रश्नचिन्ह

नागरिकांच्या मते, हे प्रकरण निकृष्ट दर्जाचे काम व निष्काळजीपणाचे द्योतक असून, नगर परिषदेने याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. आगामी काळात पावसाचा जोर वाढल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT