कळवण (नाशिक) : सप्तशृंगगड येथील ग्रामस्थांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना आवश्यक प्रशिक्षण देता यावे, यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार वनविभागाने गट क्र. ४३/१ मधील ८० आर म्हणजेच दोन एकर जमीन "व्यवसाय प्रशिक्षण केंद्र" उभारण्यासाठी मंजूर केली आहे. ही माहिती ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांनी दिली. या निर्णयामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक गडावर येतात. येथील नागरिकांची उपजीविका प्रामुख्याने या भाविकांवर आधारित असून, रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होणे ही काळाची गरज झाली होती. त्यामुळे ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीने दि. १ डिसेंबर २०२३ रोजी ठराव क्रमांक ६९ मंजूर करून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, आमदार नितीन पवार आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.
ग्रामस्थांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत उपवनरक्षक (पूर्व विभाग, नाशिक) उमेश वावरे यांनी चैत्रोत्सवात तात्पुरते बसस्थानक उभारले जाणाऱ्या परिसरात म्हणजेच धोंड्या कोंड्याच्या विहिरीजवळ, प्रशिक्षण केंद्रासाठी जमीन मंजूर केली आहे. या निर्णयासाठी सहायक वनरक्षक सोनावणे, वनपरिक्षेत्र अधिकारी कळवण दीपाली गायकवाड, वनपाल बागूल आणि वनरक्षक राठोड यांचे सहकार्य लाभले.
शासनाच्या या निर्णयाचे सरपंच रमेश पवार, उपसरपंच संदीप बेनके, सदस्य जयश्री गायकवाड, सुवर्णा पवार, कल्पना बर्डे, दत्तू बर्डे, बेबीबाई जाधव, मनीषा गवळी आदींसह सर्व ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.
सप्तशृंग निवासिनी ट्रस्ट येथे वाया जाणारे नारळाचे पाणी, शेंड्या, खोबरे या सर्व वस्तूंवर प्रक्रिया करून ट्रस्टच्या विश्वस्थांच्या मदतीने येथील बचत गटाच्या महिलांना प्रशिक्षण देऊन त्यापासून खोबरा बर्फी, शेंड्यांपासून पिशवी, पायपुसणे, नारळाचे पाणी विक्री केले जाईल त्यातून स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध होईल.राजेश गवळी, ग्रामपंचायत सदस्य
३७६ हेक्टर वनविभागाची जागा आहे तसेच २० हेक्टर गावठाण आहे. त्यामुळे सप्तशृंग गडावर येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता त्यांच्यासाठी मूलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून ग्रामपंचायतीने वनविभागाकडे जागेची मागणी केली होती. महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत आहे. तिला वनविभागाने सहा हेक्टर जागा उपलब्ध करून दिली आहे.रमेश पवार, सरपंच