नाशिक : नेपाळमधील महाप्रलयाच्या दृश्याने अंगावर अक्षरशः शहारे येत होते... नेपाळमध्ये दर्शनासाठी त्याचबरोबर मानसरोवर यात्रेसाठी नाशिकमधून गेलेले २०० भाविकांचे नाशिकमधील कुटुंबीय त्यांच्या येण्याची आतुरतेने वाट पाहात होते. आज आपले आप्तेष्ट पाहताच नातेवाइकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
नेपाळमधील पशुपतिनाथ आणि अन्य तीर्थक्षेत्र यात्रेसाठी गेलेले २०० यात्रेकरू सुखरूप मायदेशी परतले. मंगळवारी (दि.१) सकाळी त्यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. यावेळी मुंबई नाका येथे श्री औदुंबर भक्त मंडळ ट्रस्टतर्फे ढोल-ताशांच्या गजरात भाविकांचे स्वागत करण्यात आले. नेपाळवरून परतलेल्या भाविकांसह त्यांच्या नातेवाइकांनी आनंद व्यक्त करत भरपावसात ठेका धरला.
श्री औदुंबर भक्त मंडळातर्फे दरवर्षी दत्त महाराजांच्या पादुकांसह भाविकांसाठी अल्प दरात तीर्थयात्रेचे आयोजन केले जाते. मात्र, नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीमुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे यात्रेकरूंसह त्यांच्या कुटुंबीयांत चिंतेचे वातावरण होते. आपत्तीची तीव्रता लक्षात घेता मंडळाच्या सेवेकऱ्यांनी तत्काळ सतर्कता बाळगत यात्रेकरूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले.
स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यात आले. यात्रेकरू सुरक्षितपणे भारतात परतण्यास यशस्वी झाले. यात्रेकरू नाशिकमध्ये दाखल होताच त्यांच्या स्वागतासाठी मुंबई नाका परिसरात मंडळाचे पदाधिकारी, सेवेकरी, भाविक आणि मोठ्या संख्येने आप्तेष्ट उपस्थित होते. यात्रेकरूंच्या बस दाखल होताच ढोल-ताशांचा गजर सुरू झाला. अनेकांनी औक्षण करत भाविकांचे स्वागत केले. काही दिवसांच्या चिंतेनंतर आपल्या आप्तस्वकियांना सुखरूप पाहून आप्तेष्टांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.