नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या महापालिका निवडणुकीपासून सुरू झालेल्या दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चाना आता वेगळेच वळण मिळत आहे. विलीनीकरणाबाबत राष्ट्रवादी शरद पवार गट आशा बाळगून आहे, तर राष्ट्रवादी अजित पवार गट अनुत्सुक असल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा मार्ग खडतर होताना दिसत आहे.
वास्तविक, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काळातच विलीनीकरणाच्या चर्चाना वेग आला होता. त्याबाबतचे संकेतही त्यांनी स्वतःच दिले होते. गेल्या १७ जानेवारी रोजी शरद पवार आणि अजित पवार यांची निवडक पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत विलीनीकरणाबाबतची चर्चाही झाली होती.
मात्र, अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे या चर्चाना पूर्णविराम मिळतोय की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे दोन्ही गटांचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते विलीनीकरणाबाबत अपेक्षा बाळगून आहेत. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे चार नेते विलीनीकरणात अडथळा आणत असल्याचा थेट आरोपही राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
विलीनीकरण व्हावे जनतेची इच्छा दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणा-बाबतच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. विलीनीकरण व्हावे, ही जनतेचीदेखील इच्छा आहे. विलीनीकरण झाल्यास पक्षाची ताकदही वाढणार आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे हे जो काही निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल.- भास्कर भगरे, खासदार
...तर चौघांचेही महत्त्व संपेल प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे चौघे विलीनीकरण होऊ देणार नाहीत. कारण त्यांचे महत्त्व संपेल, अशी त्यांना भीती आहे. दोन अडीच महिन्यांपूर्वी जेव्हा आम्ही शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलो होतो, तेव्हा त्यांनी आताच अजितदादा येऊन गेले, आपण एकत्र येऊ असे ते म्हणत होते. हे आम्हाला सांगितले. त्यावेळी देवीदास पिंगळे, दत्ता पाटील उपस्थित होते. याचा अर्थ ही प्रक्रिया अजितदादा यांच्या काळातच सुरू झाली होती. याबाबतचा निर्णयही दादा घेऊ शकत होते. परंतु हे चौघे असे होऊ देणार नाहीत.- गजानन शेलार, माजी शहराध्यक्ष, राष्ट्रवादी, शरद पवार गट
पक्षाला एकीत बळ मिळेल दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास चांगलेच आहे. कारण त्यामुळे पक्षाला मोठे बळ मिळेल, एकीत बळ असते, हा विचार समोर ठेवून दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायला हवे. सुनेत्रा पवार या सक्षम आहेत. ज्या पद्धतीने दुःख पचवून त्यांनी मानसिक तयारी केली आहे, त्यावरून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, ही अपेक्षा आहे. -नीलिमा पवार, माजी सरचिटणीस, मविप्र
विलीनीकरणामुळे ताकद वाढेल दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण व्हावे ही अजित पवार यांची इच्छा असल्याने, वरिष्ठ स्तरावर याबाबत सकारात्मक निर्णय होणे अपेक्षित आहे. दोन्ही पक्ष एकत्र आल्यास ताकद वाढेल. वरिष्ठ स्तरावर जो काही निर्णय होईल, तो कार्यकर्ता म्हणून आम्हाला मान्य असेल.- प्रेरणा बलकवडे, नगराध्यक्ष, भगूर
पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य असेल आमच्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेलेला आहे. सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहे. विलीनीकरणाबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. याशिवाय कार्यकत्र्याच्या भावनादेखील समजून घेऊन त्या पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालणार आहोत.- रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट
विलीनीकरण व्हावे ही जनतेची इच्छा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणा-बाबतची प्रक्रिया अजितदादांच्या उपस्थितीतच सुरू झाली होती. याचा अर्थ दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणे गरजेचे आहे. त्यामुळे आता विलीनीकरणाबाबत वरिष्ठ स्तरावर सकारात्मक निर्णय घेणे अपेक्षित आहे.श्रीराम शेटे, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस