NCP vs Congress Nashik  
नाशिक

NCP vs Congress Nashik | 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! राष्ट्रवादी अन् काँग्रेस कार्यकर्ते आपापसात भिडले

NCP vs Congress Nashik | राष्ट्रवादी-काँग्रेस कार्यकर्ते भिडले'गुंगी गुडिया'वरून राजकारण तापले ; सपकाळ यांच्या पोस्टरला 'जोडे मारो' करत राष्ट्रवादीने केला निषेध

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल 'गुंगी गुडिया' असा अत्यंत अपमानकारक उल्लेख असलेला व्हिडिओ प्रसिद्ध झाला. काँग्रेसच्या या व्हिडिओमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून, राजकारण तापले आहे.

या नीच वक्तव्याच्या विरोधात अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिकच्या रस्त्यावर उतरून आक्रमक पवित्रा घेत काँग्रेसचा जोरदार धिक्कार केला. बुधवारी (दि. ५) राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर धडक मारल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने येऊन काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


आंदोलनाच्या सुरुवातीला राष्ट्रवादीच्या रणरागिणींनी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत निषेध नोंदवला. त्यानंतर हा मोर्चा थेट काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाकडे धडकला. तिथे आधीपासूनच उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी सुरू केली.

मात्र, आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या सैनिकांनी सुनेत्रा पवार यांच्या समर्थनात गगनभेदी घोषणा देत काँग्रेस कमिटीचा परिसर पार ढकलून सोडला. संतापलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला चपलांनी झोडपून (जोडे मारो) त्यांच्या पोस्टरची विटंबना करत ते फाडून रस्त्यावर भिरकावून दिले.


"काँग्रेसने राजकारणाची पातळी अत्यंत खालच्या स्तरावर नेली असून, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचा आणि एका कर्तबगार महिलेचा असा अनादर अजिबात सहन केला जाणार नाही. संपूर्ण राज्यातील महिलाशक्ती सुनेत्राताई पवारांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी त्वरित आपल्या या कृतीबद्दल संपूर्ण महाराष्ट्राची आणि सुनेत्रा पवारांची बिनशर्त माफी मागितलीच पाहिजे," असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी काँग्रेसला दिला.

आंदोलनात राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, युवक अध्यक्ष अंबादास खैरे, बाळासाहेब कर्डक, यशवंत शिरसाठ, आकाश पगार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसकडून शहराध्यक्ष नीलेश खैरे, उद्धव पवार, ज्ञानेश्वर काले, जाकीर अत्तार, इसाक कुरेशी, गौरव सोनार,

अनिल ब होत, सुदेश मोरे, संदीप वाघ, दत्ता सोनवणे, गोपाळ लहांगे, बाबा खतीब, सुनील आव्हाड, फारुख कुरेशी, शंकर जाधव, जावेद शेख, संतोष ठाकूर, संतोष कस्तुरे, आकाश घोलप, योगेश गांगुर्डे, सय्यद मनियार, गोरख साळवे, अनिल बेग, विजय पाटील, प्रवीण काटे, अरुण दोंदे, जयेश पोकळे, अशोक शेंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


गुंडाशाहीपुढे काँग्रेस झुकणार नाही

काँग्रेसचे शहराध्यक्ष नीलेश खैरे म्हणाले की, आमच्या नेत्यांनी कुठल्याही प्रकारे महिलेचा अपमान केलेला नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुनेत्रा पवार यांना पत्रकार परिषदेत बोलू दिले नाही. आमच्या नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्या दुर्गेचे रूप आले पाहिजे, तुम्ही दुर्गेचे रूप घेऊन शेतकऱ्यांचे, महिलांचे प्रश्न सोडवले पाहिजे, याविषयी ते व्यक्त होत होते. या गुंडांपुढे काँग्रेस पक्ष कधीही झुकणार नाही, असे त्यांनी सांगितले.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढून स्वतःच हसू करून घेतले आहे. त्यांनी आमच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याऐवजी नाशिककरांच्या प्रश्नांवर आणि खड्ड्यांमुळे झालेले अपघात त्यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, अशा जबाबदारीचे भान ठेवून महानगरपालिकेवर मोर्चा काढला असता तर त्याचे हसू झाले नसते. त्यांना सुबुद्धी मिळो हीच अपेक्षा शहराध्यक्ष खैरे यांनी यावेळी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT