

चांदवड/नाशिक : चांदवड तालुक्यातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाने चांदवड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे न्यायालयीन कामकाजासाठी नागरिकांना नाशिक किंवा मालेगाव येथे वारंवार जावे लागणार नाही.
कमी वेळेत आणि कमी खर्चात न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात न्यायव्यवस्था अधिक वेगवान, सक्षम आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध जिल्ह्यांत नवीन न्यायालयांच्या स्थापनेसह आवश्यक पदनिर्मितीलाही मान्यता देण्यात आली. त्यामध्ये चांदवड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे चांदवड तालुक्यातील दिवाणी स्वरूपाचे खटले स्थानिक पातळीवरच चालवणे शक्य होणार आहे. यापूर्वी न्यायालयीन कामासाठी नागरिकांना नाशिक किंवा मालेगाव येथे जावे लागत असल्याने वेळ आणि आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणात होत होता. आता ही गैरसोय दूर होणार असून, न्यायप्रक्रियेला गती मिळणार आहे.
राज्य सरकारने याच बैठकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे नवीन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि सरकारी वकील कार्यालय, नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, सरकारी वकील कार्यालय तसेच वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय, बीड जिल्ह्यातील केज येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय आणि पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे विशेष मोटार वाहन न्यायालय स्थापन करण्यासही मंजुरी दिली आहे.
चांदवड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या प्रलंबित खटल्यांच्या सुनावणीला गती मिळेल, न्यायासाठीचा वेळ आणि खर्च कमी होईल तसेच न्यायव्यवस्था अधिक सुलभ आणि प्रभावी होण्यास मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चांदवड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाच्या स्थापनेला मंजुरी ● दिल्याबद्दल शासनाचे सर्वप्रथम आभार मानतो. यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होईल व जलद गती न्याय मिळेल.
- अॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष, बार असोसिएशन
वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाच्या स्थापनेमुळे चांदवडच्या ● न्यायव्यवस्थेला नवे बळ मिळणार असून, तालुक्याच्या प्रशासकीय आणि न्यायिक विकासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. नागरिकांना देखील दिलासा मिळणार आहे. लवकरच हे न्यायालय सुरू होणार आहे.
- डॉ. राहुल आहेर, आमदार