नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हातात ड्रोनचे रिमोट कंट्रोल घेऊन शेतात तंत्रज्ञानाची क्रांती घडवणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील एका ग्रामीण महिलेने थेट जागतिक पटलावर भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. पिंपळगाव बसवंत येथील 'नमो ड्रोनदीदी' प्रियंका ऋषिकेश मोहिते यांनी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे आयोजित 'सियाल पॅरिस फूड बिजनेस २०२६' या नामांकित आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भारताचे अधिकृत प्रतिनिधित्व करून देशाचा आणि महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे.
भारत सरकार आणि 'इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन' (आयटीपीओ) यांच्या विशेष निमंत्रणावरून प्रियंका मोहिते यांना या आंतरराष्ट्रीय मंचावर सहभागी होण्याची संधी मिळाली. 'भारतीय कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतात महिलांची बदलती सक्षम भूमिका' या विषयावर त्यांनी जागतिक स्तरावरील उद्योजक व प्रतिनिधींसमोर आपले विचार व अनुभव प्रभावीपणे मांडले. प्रियंका मोहिते या 'उमेद' -महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या स्वयंसहायता समूहाच्या सक्रिय सदस्य आहेत. ग्रामीण भागातील...
जागतिक स्तरावर कौतुक
पॅरिस येथील या भव्य प्रदर्शनात विविध देशांचे कृषितज्ज्ञ, तंत्रज्ञानतज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित होते. भारताच्या ग्रामीण भागातील एका महिलेने ड्रोनसारख्या प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घडवलेली कृषीक्रांती ऐकून उपस्थांकितांनी त्यांचे विशेष कौतुक केले. पिंपळगाव बसवंतसारख्या एका ग्रामीण भागातून सुरू झालेला हा प्रवास जागतिक व्यासपिठापर्यंत पोहोचल्याने नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पारंपरिक चौकटीबाहेर पडून त्यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञान आत्मसात केले. 'नमो ड्रोनदीदी' योजनेच्या माध्यमातून त्यांनी शेतात खते व औषध फवारणीसाठी आधुनिक ड्रोनचा वापर सुरू केला. केवळ स्वतः तंत्रज्ञान न शिकता, त्यांनी गावातील इतर महिलांनाही शेतीतील नव्या तंत्रज्ञानाची जोड दिली.
आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानामुळे शेतीतील वेळ, श्रम आणि खर्चाची मोठी बचत झाली असून, ग्रामीण महिलांसाठी हा रोजगाराचा एक नवा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम स्रोत बनला आहे. प्रियंका मोहिते यांनी या माध्यमातून महिला सबलीकरण आणि ग्रामीण महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी ठरले आहे.