नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नाशिकरोड रेल्वेस्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाने तत्परता दाखवत रेल्वेत प्रसूती झालेल्या महिलेला आणि तिच्या व नवजात बालकाला वेळेत वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली. 'ऑपरेशन मातृशक्त्ती' अंतर्गत केलेल्या या मानवतावादी कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. १५ जूनला गाडी क्र. १३२०१ , नाशिकरोड स्थानकातून रवाना होताना प्लॅटफॉर्म क्र. ४ वर ड्यूटीवरील उपनिरीक्षक दिलीप कुमार यांना प्रवासी राधेश्याम व त्यांच्या पत्नी हीना यांनी एका महिला प्रवाशाची रेल्वेत प्रसूती झाल्याची माहिती दिली.
संबंधित महिला सामान्य डब्यातील स्वच्छतागृहाजवळ एकटीच असल्याचे त्यांनी सांगितले. माहिती मिळताच आरपीएफने उपस्थानक व्यवस्थापक अश्विनी हैरी व वैद्यकीय कर्मचारी राजू यादव यांना कळवून तातडीने मदतकार्य सुरू केले. प्रसूत महिलेची सुरक्षितता लक्षात घेऊन माहिती देणाऱ्या महिला प्रवासी हीना यांना तिच्यासोबत थांबवण्यात आले.
रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. चौकशीत संबंधित महिलेने नाव परवीन (२५, रा. अकोला) असल्याचे सांगितले. ती मुंबईकडे प्रवास करत असताना नाशिकरोड स्थानकापूर्वी अर्धा तास आधीच तिची प्रसूती झाल्याचे तिने सांगितले. आरपीएफने तत्काळ तिचे पती शेख वाजिद यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर प्रसूत महिला व नवजात बालकाला पुढील उपचारासाठी
बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. या कार्यात रेल्वे कर्मचारी संदीप खटणा, सुजित यादव, शंकर यादव, राहुल पाटील तसेच महिला प्रवासी हीना यांनी सहकार्य केले. सुरक्षेच्या दृष्टीने आरक्षक शंकर यादव यांनाही रुग्णालयात पाठवण्यात आले. आरपीएफच्या संवेदनशील भूमिकेमुळे प्रसूत महिला व नवजात बालकास वेळेत वैद्यकीय मदत मिळाली. या कार्याबद्दल महिलेचे पती वाजिद शेख यांनी दूरध्वनीद्वारे आरपीएफ नाशिकरोड आणि मध्य रेल्वेचे आभार मानले.
'ऑपरेशन मातृशक्ती' म्हणजे काय
महिला प्रवासी, गर्भवती महिला, प्रसूत माता आणि बालकांच्या सुरक्षेसाठी व मदतीसाठी रेल्वे सुरक्षा बलाकडून राबवण्यात येणारा विशेष उपक्रम म्हणजे 'ऑपरेशन मातृशक्ती' आहे. या उपक्रमांतर्गत गरजू महिलांना तातडीची वैद्यकीय मदत व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.