Nashik News 
नाशिक

Nashik News | नाशिकच्या बालेकिल्ल्यात जळगावच्या व्यापाऱ्याला न्याय

Nashik News | नाशिकरोड गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जळगाव येथील व्यापाऱ्याच्या धान्याच्या मालाचा अपहार करणाऱ्या चालकास जेरबंद करून संपूर्ण रक्कम व वाहन जप्त करण्यात नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकास यश आले आहे. या कारवाईमुळे जळगावच्या व्यापाऱ्याला न्याय मिळाला असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.

नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. ४०/२०२६ भारतीय न्यायसंहिता कलम ३०६ अन्वये दाखल गुन्ह्याचा तपास सुरू होता. या गुन्ह्याची हकीकत अशी की, फिर्यादी दौलत देवानी यांनी जळगाव एमआयडीसी येथील उषा इंटरप्रायजेस, वसंत इंटरप्रायजेस आणि कोगटा इम्पोर्ट एक्सपोर्ट प्रा. लि. (डाळ मिल) येथून हिरवा वाटाणा, मठ, डाळ, मूग व हरभरा डाळ असा एकूण १०५ कट्ट्यांचा, दोन लाख ३९ हजार ७३२ रुपयांचा माल नाशिक येथे पोहोचविण्यासाठी विश्वासू चालक अजिज खान याच्याकडे सोपविला होता.

मात्र, अजिज खान याने नाशिकरोड येथील सुभाष रोड परिसरात संपूर्ण माल अपहार करून त्याची चोरीने विल्हेवाट लावली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिस हवालदार विशाल पाटील तपास करीत होते. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) बडेसाहेब नाईकवाडे तसेच सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने तपासाला गती दिली.

अजिज खान हा महिंद्रा पिकअपसह देवळाली गावातील गांधी पुतळा परिसरात येणार असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे २७जानेवारी रोजी सापळा रचून अजिज खानला पिकअपसह ताब्यात घेतले गेले.

चौकशीत त्याने आपले नाव अजिज अहमद खान (वय ३४, रा. सुभाष रोड, गुलजारवाडी, नाशिकरोड) असल्याचे सांगून गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून अपहार करून विकलेल्या धान्याची संपूर्ण रोख रक्कम दोन लाख ४० हजार रुपये तसेच आठ लाख रुपये किमतीची महिंद्रा पिकअप मालवाहू गाडी असा एकूण १० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT