नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या वाहतूक बेटांची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे. देखभाल आणि स्वच्छतेअभावी ही बेट धुळीने माखली असून, कचरा, वाढलेले गवत, तुटलेल्या संरचना आणि बंद पडलेल्या विद्युत रोषणाईमुळे शहराच्या सुशोभीकरणालाच ग्रहण लागले आहे. विकासकामांमध्ये व्यग्र असलेले अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिर्धीचे दुर्लक्ष यामुळे नाशिकरोड परिसरातील प्रमुख चौकांचे विद्रुपीकरण होत असल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
परिसरातील बहुतांश वाहतूक बेटे महापालिकेने विविध विकासकांना देखभालीसाठी दिली आहेत. बिटको चौक, दत्त मंदिर सिसल, त्रिकोणी गार्डन परिसर, नेहरुनगर, वास्को चौक, शिखरेवाडी, गांधीनगर, उपनगर, सैलानी बाबा चौक, नारायण बापू चौक, विहितगाव, वडनेर यांसह अनेक ठिकाणी आकर्षक कारंजे, विद्युत रोषणाई, वृक्षलागवड, सामाजिक संदेश देणाऱ्या कलाकृती उभारून परिसराला आकर्षक स्वरूप देण्यात आले होते.
मात्र, आता या सुशोभीकरणाच्या वस्तूंची देखभाल होत नसल्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. काही ठिकाणी कारंजांची तोडफोड झाली असून, आकर्षक रोषणाईसाठी बसविलेल्या यंत्रणा गायब झाल्या आहेत.
हिरवळीच्या ठिकाणी गवत वाढले असून, काही भागात मद्यपान करणाऱ्यांचा वावर वाढल्याने दारूच्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास आणि कचरा आढळत आहे. वाळलेली झाडे गावात, पालापाचोळा आणि अस्वच्छतेमुळे या बेटांचे रूपांतर समस्यांच्या ठिकाणी झाले आहे.
सामाजिक संदेश देण्यासाठी उभारण्यात आलेले विद्यार्थ्यांचे पुतळे, इतर कलाकृती आणि सुशोभीकरणाच्या वस्तूंवर धूळ, थुंकीचे डाग आणि घाण साचली आहे. स्वच्छता नाशिकरोड येथील कर्मचाऱ्याचा उभारण्यात आलेला पुतळाही गवत आणि कचऱ्याने वेढला गेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून, महापालिकेने वाहतूक बेटांचा पुन्हा ताबा घेऊन नियमित देखभाल व स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
परिसरातील उद्यानांचा दुरुपयोग वाढला
नाशिकरोड येथील अनेक उद्याने आणि सुशोभीकरण केलेल्या जागांचा सध्या योग्य वापर होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. अनेक ठिकाणी उद्यानांचा वापर खाद्यपदार्थांच्या गाड्या, रिक्षा थांबे, अनधिकृत बॅनर, वाढदिवस व घरगुती कार्यक्रमांसाठी केला जात आहे. काही भागात असामाजिक घटकांचा वावर, गर्दुल्ले, फिरस्ती आणि भिकाऱ्यांचा मुक्काम यामुळे उद्यानांचे मूळ उद्दिष्ट्च हरवित असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.