Sindhudurg News : सावंतवाडी न.प.ने 'ग्रो बीग' कंपनीला मुदतवाढ नाकारली

सर्वपक्षीय नगरसेवकांचा ठराव संमत; नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांची पत्रकार परिषद
Sindhudurg News
Published on
Updated on

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मोठा निर्णय घेत मायकल डिसोजा यांच्या 'ग्रो बीग टेक्नॉलॉजी' कंपनीला मुदतवाढ न देण्याचा ठराव सर्वपक्षीय संमतीने मंजूर करण्यात आला आहे. जिमखाना मैदानावरील ऐतिहासिक वस्तू संग्रहालय व कलादालनासाठी आरक्षित जागा रिकामी करण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले आहेत, अशी माहिती नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले आणि पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

१५ दिवसांची मुदत संपूनही दीड महिना जागेचा वापर

श्रद्धाराजे भोसले म्हणाल्या, शहरातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून आम्ही 'ग्रो बीग' कंपनीला फक्त १५ दिवसांसाठी नगरपरिषदेची एक खोली भाड्याने वापरण्यास दिली होती. मात्र, कंपनीने दोन खोल्यांचा वापर केला आणि १५ दिवस संपल्यानंतरही दीड महिना जागा खाली केली नाही. उलट याबाबात विचारणा केली असता प्रशासनालाच उलट प्रश्न विचारण्यात आले. भविष्यात कर्मचाऱ्यांचे पगार किंवा पैशांचे गैरव्यवहार झाल्यास नगरपरिषद जबाबदार राहणार नाही, ही खबरदारी घेत भाजप, शिवसेना, उबाठा शिवसेना आणि काँग्रेस या सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येत कंपनीची मुदतवाढ नामंजूर केली. रोजगाराच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, नगरपरिषद स्थानिक पातळीवर रोजगारासाठी प्रयत्नशील असून २७ जणांना 'लाड पागे' योजनेखाली सामावून घेण्यात आले आहे.

५७ कोटींच्या नळपाणी योजनेतील भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले

माहितीच्या अधिकारात नागरिकांनी ५७ कोटींच्या नळपाणी पुरवठा योजनेत केलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी पूर्णपणे खोडून काढले. ते म्हणाले, ठेकेदाराकडून नियमानुसार आणि योग्य पद्धतीनेच काम पूर्ण करून घेतले जाईल. जिथे चुकीचे काम झाले आहे, तिथे पुन्हा दुरुस्तीचे आदेश दिले आहेत. ही योजना शक्यतो गुरुत्वाकर्षणावर चालणार असून, शहराला जास्तीत जास्त पाणी पुरवण्याचा आमचा मानस आहे. पाणी योजनेसाठी झालेले खोदकाम आणि खडीकरण पूर्ण झाले असून, पावसाळ्यानंतर रस्त्यांचे डांबरीकरण केले जाईल. काम पूर्ण झाल्यानंतर पुढील दोन वर्षे या योजनेची देखभाल व दुरुस्ती करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असेल.

'प्लास्टिक मुक्त सावंतवाडी'साठी अभिनव उपक्रम

शहराला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी नगरपरिषदेने नवीन पावले उचलली आहेत. शहरात नवीन बॉटल क्रशर मशीन लावण्यात आल्या आहेत. यामध्ये प्लास्टिकची रिकामी बाटली क्रश करताच नागरिकांना चॉकलेट मिळणार आहे, जेणेकरून लोकांना कचरा योग्य ठिकाणी टाकण्याची सवय लागेल. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी मशिनमध्ये ५ रुपये टाकताच कापडी पिशवी मिळण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, उद्यान सभापती मोहिनी मडगावकर, नगरसेविका सुकन्या टोपले आणि इतर नगरसेविका उपस्थित होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news