Zilla Parishad Nashik / जिल्हा परिषद नाशिक Pudhari News Network
नाशिक

Nashik Zilla Parishad | सीईओंच्या आदेशाला अतिरिक्त सीईओंचा खो

Nashik Zilla Parishad | कर्मचारी बदलीवरून सामान्य प्रशासन विभागाची कोंडी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिलेल्या आदेशाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्याकडूनच खो घातला जात आहे. ओमकार पवार यांनी कामकाजाच्या दृष्टीने बांधकाम विभागातून एका कर्मचाऱ्यांची सामान्य प्रशासन विभागात बदली केली.

मात्र, डॉ. गुंडे यांनी सदर कर्मचाऱ्यांस बांधकाम विभागात कायम ठेवावे, असे पत्र प्रशासनाला दिले आहे. डॉ. गुंडे यांच्या या पत्रामुळे मात्र सामान्य प्रशासन विभागाची कोंडी झाली आहे. बांधकाम विभाग तीनमधील वरिष्ठ सहायक लिपिक विशाल कामडी यांची कामकाजाच्या दृष्टीने सामान्य प्रशासन विभागात काही दिवसांपूर्वी बदली केली होती.

बदली झाल्यानंतर सदर कर्मचारी विभागात रुजूदेखील झाला अन् कामकाजाला सुरुवात देखील केली. मात्र, सदर कर्मचाऱ्यांस पुन्हा बांधकाम विभाग तीनमध्ये कायम ठेवावे, अशी मागणी विभागाचे कार्यकारी अभियंता यांसह डॉ. गुंडे यांनी करत प्रशासनाला याबाबत पत्र दिले आहे. बांधकाम तीनच्या कामकाजाचा आढावा घेतला असता विभागांतर्गत येवला, नांदगाव, चांदवड व निफाड या मोठ्या तालुक्यांचे कामकाज आहे.

सदर कार्यालयात बहुतांश महिला कर्मचारी, दिव्यांग कर्मचारी कार्यरत असून, लेखाविषयक कामकाजाचा अनुभव नसलेले नवीन कर्मचारी असल्याने कामकाजात विलंब व चुका होऊन कामे प्रलंबित राहत असल्याचे दिसून येत आहे.

याबाबत संबंधित तालुक्यांमधील लोकप्रतिनिधी, कंत्राटदारांच्या तक्रारी प्राप्त होत आहे. यातच आर्थिक वर्ष संपण्यास महिनाभराचा कालावधी शिल्लक असून, अनुदान खर्चविषयक कामकाज विहित वेळेत व अचूक होणे आवश्यक आहे.

अनुदानविषयक कामकाज प्रलंबित राहिल्यास निधी अर्खित राहण्याची शक्यता आहे. सदर कर्मचाऱ्यांकडे विभागात बजेट संकलन, अंगणवाडी, १५ वा वित्त आयोग, राज्य सरोवर योजना, ग्रामसचिवालय आदी महत्त्वाचे कामकाज असून, त्याचा अनुभव आहे. तरी प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने सदर कर्मचाऱ्यांस बांधकाम तीन मध्ये कामकाजाचे आदेश कायम ठेवावे, असे डॉ. गुंडे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

बांधकामसाठी अट्टहास का ?

बांधकाम विभागात बदलीसाठी कर्मचाऱ्यांचा प्रयत्न असतो. या 1 विभागातून इतर बदली झाल्यास लागलीच पुन्हा विभागात बदली करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत प्रयत्न सुरू असतो. त्यामुळे बांधकाम विभागासाठी इतका कर्मचाऱ्यांचा अट्टहास का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT