नाशिक : जिल्हा परिषदेच्या सेस फंड योजनेंतर्गत रब्बी हंगाम २०२५-२६ साठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हरबरा बियाणांसाठी ५० टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे यांनी दिली. योजनेअंतर्गत एकूण १४१.४० क्विंटल हरभरा बियाणे वितरित करण्यात येणार असून, 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर लाभार्थ्यांची निवड केली जाईल. इच्छुक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर संबंधित पंचायत समिती कार्यालयात अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
लाभ फक्त हरभरा पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच दिला जाईल. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर अर्ज स्वीकारले जातील. अर्ज करताना ७/१२ आणि ८-अ चे अद्ययावत उतारे सादर करणे आवश्यक आहे. एका शेतकऱ्याला अधिकतम १ हेक्टरसाठीच बियाण्याचा लाभ मिळेल. एकदा लाभ घेतल्यानंतर पुन्हा लाभ मिळणार नाही. बियाणे हे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, सातपूर, नाशिक यांच्याकडून खरेदी करण्यात येणार आहे. ५० टक्के अनुदानानंतर उर्वरित रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येईल.
प्रति पॅकसाठी हरभऱ्याचा दर २२६० रुपये असून, पन्नास टक्के अनुदान वगळता तो ११३० रुपये राहणार आहे. शेतकऱ्यांनी ११३० रुपये भरावे लागणार आहे. शेतकऱ्यांनी बियाणे वाटपाच्या आधीच संबंधित रक्कम भरून पुरवठादार संस्थेच्या नावे डीडी (डिमांड ड्राफ्ट) तयार करून पंचायत समितीकडे सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे वेळेत अर्ज करण्याचे आवाहन शेवाळे यांनी केले आहे.