Zilla Parishad Nashik : नागरिकांना घरबसल्या मिळणार शासकीय सेवा
ठळक मुद्दे
जनसेतू ठरणार नागरिक व शासनामधील डिजिटल सेतू
जि. प.चे अभिनव पाऊल, व्हाॅट्सॲपवर 22 सेवा उपलब्ध
प्राथमिक शिक्षण विभागाच्या १२ अशा एकूण २२ महत्त्वपूर्ण सेवांचा समावेश
Zilla Parishad Nashik's innovative step to provide government services through digital medium
नाशिक : ग्रामीण भागातील नागरिकांना डिजिटल माध्यमातून शासकीय सेवा देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद नाशिकने अभिनव पाऊल टाकले आहे. लोकसेवा हक्कांतर्गत मिळणाऱ्या विविध शासकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी आता शासकीय कार्यालय गाठण्याची आवश्यकता नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली “जनसेतू” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या अधिकृत व्हाॅट्सॲप क्रमांकावरून तब्बल २२ सेवा नागरिकांना घरबसल्या उपलब्ध होणार आहेत. यात ग्रामपंचायत विभागाच्या सात, महिला व बालकल्याण विभागाच्या तीन, तसेच प्राथमिक शिक्षण विभागाच्या १२ अशा एकूण २२ महत्त्वपूर्ण सेवांचा समावेश आहे. या सुविधा मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये वापरता येतील.
उपक्रमाची वैशिष्ट्ये अशी...
ग्रामपंचायत, महिला व बालकल्याण व शिक्षण विभागाच्या महत्त्वाच्या सेवा एकाच ठिकाणी
मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये मिळणार सेवा
जिल्हा परिषदेच्या कोणत्याही विभागाविषयी तक्रार थेट संबंधित विभागप्रमुख तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची सुविधा.
दिल्या जाणाऱ्या सेवा अशा ...
ग्रामपंचायत विभागाच्या सेवा : जन्म, मृत्यू व विवाह नोंद दाखला, दारिद्ऱ्य रेषेखालील असल्याचा दाखला, ग्रामपंचायतीचे येणे बाकी नसल्याचा दाखला, नमुना क्र. ८ चा उतारा, निराधार दाखला
महिला व बाल विकास विभागाच्या सेवा : अंगणवाडीत गरोदर महिलांची नाव नोंदणी, सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालकांची नावनोंदणी, तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांची अंगणवाडीत नोंदणी.
प्राथमिक शिक्षण विभागाच्या सेवा : शाळा सोडल्याच्या दाखल्यावर प्रतीस्वाक्षरी, (महाराष्ट्राबाहेरील शिक्षणासाठी) विद्यार्थ्यांच्या जात, जन्मतारीख, नाव बदल मान्यता आदेश, खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांचे वैद्यकीय खर्च मंजुरी आदेश (२ लाख रुपयांपर्यंत), खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विविध मान्यता आदेश (वैयक्तिक मान्यता, वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी, पदोन्नती मान्यता), विनाअनुदानितवरून अनुदानित पदावर बदलीस मान्यता, सेवानिवृत्ती लाभ मंजुरी (भविष्य निर्वाह निधी, रजा रोखीकरण, अंशराशीकरण), अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर समायोजन व बदली मान्यता.
प्राथमिक शाळांमधील प्रभारी मुख्याध्यापक मान्यता.
नाशिक जिल्हा परीषद व्हॉट्सअप सुविधेचा लाभ घेण्यासाठी वरील क्यूआर कोड स्कॅन करा.
वेळ, श्रम आणि अनावश्यक प्रवास वाचणार
जि.प.चा +91 7263061766 हा अधिकृत व्हाॅट्सॲप क्रमांक असून, या क्रमांकावर Hi मेसेज करून नागरिकांना सेवांचा लाभ घेता येईल. या डिजिटल उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ, श्रम आणि अनावश्यक प्रवास वाचणार असून, पारदर्शक व कार्यक्षम प्रशासनाचा अनुभव त्यांना मिळणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनाही मोबाइलच्या एका क्लिकवर शासकीय सेवा सहज उपलब्ध होतील, हा या उपक्रमाचा मोठा फायदा आहे.
जनतेपर्यंत सेवा पोहोचवणे हीच खरी लोकाभिमुख प्रशासनाची ओळख आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकृत व्हाॅट्सॲप क्रमांकावरून २२ सेवा उपलब्ध करून देताना आमचा उद्देश प्रत्येक नागरिकाला घरबसल्या, सोप्या व पारदर्शक पद्धतीने शासनाच्या योजना व सेवांचा लाभ मिळवून देणे हा आहे. या उपक्रमामुळे नागरिक व शासनामधील दरी कमी होऊन 'जनसेतू' हा खऱ्या अर्थाने डिजिटल सेतू ठरणार आहे.
ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
