Zilla Parishad Nashik / जिल्हा परिषद नाशिक Pudhari News Network
नाशिक

Nashik Kumbh Mela 2026 | सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक जिल्हा परिषद ॲक्शन मोडमध्ये; सीईओ ओमकार पवार यांचे महत्त्वाचे निर्देश

Nashik Kumbh Mela 2026 | जिल्हा परिषदेच्या सीईओंची गटविकास अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील पर्यटनवृद्धी, भाविकांसाठी आवश्यक सुविधा आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीला गती देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिले.

ओमकार पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत कुंभमेळ्यादरम्यान नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरासह जिल्ह्यातील विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन स्थळांवर भाविक व पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील पर्यटन स्थळांवरील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्वच्छतागृहांची देखभाल आणि मूलभूत सुविधांची दुरुस्ती याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या. कुंभमेळ्याच्या काळात संभाव्य अतिवृष्टी, पूरस्थिती, दरडी कोसळण्याच्या घटना, गर्दी व्यवस्थापन तसेच आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन, सर्व तालुक्यांचे आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत ठेवण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.

संवेदनशील ठिकाणांची माहिती संकलित करणे, आपत्कालीन यंत्रणांशी समन्वय राखणे आणि ग्रामस्तराव जनजागृती अभियान राबविण्याच्या सूचनाही करण्यात आल्या याशिवाय ग्रामपंचायत, पंचायत समिती, महसूल आरोग्य, पोलिस आणि इतर विभागांत प्रभावी समन्वय ठेवून काम करण्यावर भर देण्यात आला.

कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून जिल्ह्याच्या पर्यटन, विकास आणि प्रशासकीय व्यवस्थापन क्षमतेचे प्रदर्शन करण्याची मोठी संधी असल्याचे नमूद करीत सर्व अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध व जबाबदारीने काम करण्याचे आवाहन ओमकार पवार यांनी केले.

बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मारुती मुळे, डॉ. वर्षा फडोळ, जिल्ह आरोग्याधिकारी डॉ. सुधाकर मोरे, प्रताप पाटील, दीपक पाटील, संदीप सोनवणे, डॉ. राजेंद्र बागूल उपस्थित होते.

धार्मिक पर्यटन स्थळांचे सर्वेक्षण

सीईओ पवार यांनी निर्देशन दिले की, प्रत्येक पंचायत समितीने आपल्या कार्यक्षेत्रातील धार्मिक, पर्यटन व नैसर्गिक स्थळांचे सर्वेक्षण करून भाविकांच्या संभाव्य हालचालींचे नियोजन करावे. त्यांनी ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वयं-साहाय्यता गट, ग्रामपंचायती आणि युवक मंडळांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावरही भर दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT