नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर करण्यात आलेल्या गट, गण प्रारूप आराखडा जाहीर झाल्यानंतर यंत्रणेकडे हरकती नोंदविण्याचा सोमवार (दि. २१) अंतिम दिवस आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून एकूण ६ हरकती प्राप्त झाल्या आहेत.
हरकतींचे तपशीलवार विवरण असे...
१६ जुलै - २ नांदगाव, १ निफाड
१७ जुलै - १ देवळा
१८ जुलै - देवळा, चांदवड प्रत्येकी एक
न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली. याचाच भाग म्हणून प्रतीक्षा लागलेल्या जिल्हा परिषदेच्या गट-गणरचनेचे प्रारूप सोमवारी (दि.१४) प्रसिद्ध करण्यात आले. चांदवड, सुरगाणा आणि मालेगाव या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक गट वाढल्याने त्यानुसार नकाशे तयार करण्यात आले आहेत.
तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद याठिकाणी याद्या प्रसिद्ध झाल्या. पहिले दोन दिवस निरंक गेल्यानंतर १६ जुलैपासून हरकती नोंदविण्यास सुरुवात झाली. तीन दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातून एकूण ६ हरकती प्राप्त झाल्या आहेत. देवळा दोन, नांदगाव दोन, तर चांदवड व निफाड प्रत्येकी एक हरकत नोंदवण्यात आली आहे. बागलाण, मालेगाव, कळवण, सुरगाणा, पेठ, दिंडोरी, येवला, नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या तालुक्यांतून अद्याप कोणतीही हरकत प्राप्त झालेली नाही.
२१ जुलैपर्यंत त्यावर हरकती नोंदविण्यासाठी मुदत आहे. हरकती नोंदविण्यासाठी तहसीलदार कार्यालयात व्यवस्था करण्यात आली असून, २१ जुलैपर्यंत त्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तहसील कार्यालयांमध्ये प्राप्त होणाऱ्या हरकती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविल्यानंतर प्राप्त हरकतींच्या आधारे अभिप्रायासह प्रस्ताव २८ जुलैपर्यंत विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाकडे सादर केला जाणार आहे. ११ ऑगस्टपर्यंत सुनावणी घेऊन हरकती निकाली काढल्यानंतर गट-गणरचनेचे अंतिम प्रारूप १८ ऑगस्टपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर केले जाणार आहे.