नाशिक

नाशिक जिल्हा परिषद : अखेरच्या दोन दिवसांसाठी आरोग्य विभागाची तत्परता

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने काढलेल्या कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी भरती प्रक्रियेसाठी अनुभव प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने अखेरच्या दोन दिवसांसाठी तत्परता दाखवत सिंगल विंडो सिस्टिम कार्यरत केली आहे. याबाबत दैनिक 'पुढारी'त वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सीईओ मित्तल यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली होती. त्यानंतर आरोग्य विभागाने तत्परता दाखवली आहे.

आरोग्य विभागाने शनिवारपर्यंत अवघ्या ८ वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनुभव प्रमाणपत्र दिले होते. मात्र, मित्तल यांच्या आदेशानंतर सोमवारी ३५ हून अधिक कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनुभव प्रमाणपत्र दिले आहे. तसेच अन्य प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी करुन उर्वरीत प्रमाणपत्रेदेखील लवकरात लवकर वितरीत केली जात आहेत. भरतीत वैद्यकीय अधिकारी म्हणून कोणत्याही शासकीय यंत्रणेत काम केल्याचा अनुभव विहीत नमुन्यात आणि वरिष्ठांच्या लेटरहेडवर देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच कंत्राटी वैद्यकीय अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे ते घ्यायला येत आहे.

पुढारी इम्पॅक्ट

तातडीने प्रमाणपत्र देण्यास प्रारंभ
कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनुभव प्रमाणपत्रासाठी हेलपाटे मारावे लागत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जि. प. सीईओ आशिमा मित्तल यांनी सर्व कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनुभव प्रमाणपत्र मिळण्यासाठी जिल्हा परिषदेतच सिंगल विंडो प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घालून वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनुभव प्रमाणपत्र तातडीने देण्यास प्रारंभ केला आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT