नाशिक : पुढारी वृत्तसेवा
समाजातील एकल महिला व पुरुषांना सन्मानाने नव्या आयुष्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेने सुरू केलेले कार्य कौतुकास्पद आहे. जि. प. प्रशासन केवळ प्रशासकीय कामे न करता, सामाजिकदृष्ट्या लोकाभिमुख उपक्रम राबवून समाजपरिवर्तनाचा सकारात्मक व प्रेरणादायी ठसा उमटवित आहे, असे गौरवोद्वार आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी काढले.
जिल्हा परिषद नाशिकच्या 'नवचेतना' अभियानांतर्गत आयोजित मोफत सर्वजातीय राज्यस्तरीय पुनर्विवाह वधू-वर परिचय मेळाव्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. जि.प.च्या नूतन इमारतीत हा मेळावा झाला. आमदार फरांदे यांनी जि. प. नाशिकच्या या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
समाजातील विधवा, विधुर, परित्यक्ता व घटस्फोटित व्यक्तींच्या संवेदनशील प्रश्नांना हात घालत पुनर्विवाहासारख्या महत्त्वपूर्ण विषयावर जि. प. प्रशासनाने या मेळाव्यात राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या सहभागी महिला व पुरुषांनी परस्पर संवाद साधला. साऊ एकल महिला समितीचे राज्य प्रतिनिधी अशोक कुटे यांनी वधू-वरांचे बायोडेटा वाचन केले. मागील मेळाव्यात विवाहबद्ध झालेल्या दाम्पत्यांनी आपले अनुभव सांगून उपस्थितांचे मनोधैर्य वाढविले.
असा अभिनव सामाजिक उपक्रम राबविणारी नाशिक जि. प. ही राज्यातील पहिलीच जि. प. असल्याचे सांगत सहभागी उमेदवारांनी प्रशासनाचे आभार मानले. घेतलेला पुढाकार दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे एकल महिलांना समाजात मानाचे स्थान आणि नवी उमेद मिळत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार म्हणाले की, नवचेतना अभियानांतर्गत आयोजित हा दुसरा पुनर्विवाह मेळावा असून, समाजातील एकल व्यक्तींना सन्मानाने पुनर्विवाहासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी जि. प. कटिबद्ध आहे. समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी हे अभियान सातत्याने राबविले जाईल.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) प्रताप पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) डॉ. वर्षा फडोळ, समाजरत्न नानजीभाई ठक्कर ठाणावाला, महिला व बालविकास विभागातील अधिकारी, पर्यवेक्षिका व कर्मचारी उपस्थित होते. त्रिलोक भामरे यांनी सूत्रसंचालन केले.