नाशिक : शहरी भागात बिबटयाची दहशत असतानाच जिल्हा परिषदेच्या जुन्या आणि नवीन इमारतीतील कर्मचाऱ्यांनी बिबटयाची धास्ती घेतली आहे. जुन्या जिल्हा परिषदेमागे रविवारी (दि.14) रात्री बिबटयाचे दर्शन झाले. त्यामुळे या इमारतीत कार्यरत विभागांमधील कर्मचाऱ्यांत सोमवारी (दि.15) भितीचे वातावरण होते. तर, नवीन प्रशासकीय इमारतीमागे देखील शेती असल्याने बिबटया येण्याची भिती कर्मचारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.
गडकरी चौकातील विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालय परिसरात शुक्रवारी (दि.12) बिबटया दिसला होता. सारडा सर्कल परिसरातील ख्रिस्ती कब्रस्तानमध्ये बिबटया आढळून आल्याची अफवा पसरली होती. यामुळे तीन दिवसांपासून या परिसरात बिबटयाचा शोध घेतला जात आहे. असे असतानाच, रविवारी (दि.14) रोजी रात्री अकराच्या सुमारास जुन्या जिल्हा परिषदेमागील परिसरात बिबटया आढळून आल्याचे सुरक्षारक्षकाच्या निर्देशनास आले. त्यावेळी सुरक्षारक्षकाने तात्काळ वन विभागाला कळविल्याने वन विभागाचे पथक तात्काळ दाखल झाले अन त्यांनी शोधमोहिम सुरू केली. मात्र, उशीरापर्यंत बिबटया आढळून आला नाही. या घटनेनंतर सोमवारी जुन्या जिल्हा परिषदेतील कार्यरत असलेले बांधकाम, कृषी, माध्यमिक, लघुपाटबंधारे विभागातील कर्मचारी वर्गात भिती पसरली होती.
जुन्या जिल्हा परिषदेतील कर्मचारी वर्गात भितीचे वातावरण असताना नवीन प्रशासकीय इमारतीतील कर्मचा-यांनी बिबटयाची धास्ती घेतली आहे. या इमारतीमागे शेत असून हिरवीगार झाडे आहेत. शिवाय हा परिसर मोकळा असल्याने येथून बिबटया येण्याचा धोका आहे्. इमारतीच्या तळ मजल्यावर अद्याप काम सुरू आहे, येथे लाईटची व्यवस्था नाही त्यामुळे अंधार पसरलेला असतो. त्यामुळे बिबटया घुसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी कर्मचारी वर्गाकडून होत आहे.
जुन्या जिल्हा परिषदेच्या मागील बाजूस बिबटया दिसल्याचे सांगण्यात आले. याबाबत वनविभागाशी संपर्कात असून, आवश्यक असलेल्या उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात येतील.ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक