नाशिक : जिल्ह्यातील कुपोषणावर लक्ष केंद्रित करून कुपोषित बालकांची संख्या चार महिन्यांत निम्म्यावर आणण्याचे नियोजन आहे. शेतकरी कुटुंबात वाढलेलो असल्यामुळे जिल्हा परिषदांच्या शाळांची व्यथा माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांच्या पटसंख्या वाढून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी काम करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी सांगितले. सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी दैनिक 'पुढारी'शी विविध विषयांवर संवाद साधत, जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढविण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही सांगितले.
टँकरचा शाप पुसण्यासाठी जिल्हा टँकरमुक्त करण्याचा संकल्प
जलजीवन मिशन योजनेतील पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यावर भर
श्रमदानातून बंधारे उभारण्याचा प्रयत्न
पशुसंवर्धन अंतर्गत ॲप विकसित करून जनावरांची माहिती अपडेट करणार
कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरणार, त्यांच्या अडचणी सोडवणार
कुपोषणमुक्तीसाठी आपले काय अभियान आहे?
जिल्ह्याला लागलेला कुपोषणाचा डाग हटवण्याचा निर्धार केला असून, त्यातून कुपोषणमुक्तीचा माझा संकल्प आहे. ठरवले म्हणजे कुपोषण एकाएकी कमी होणार नाही. त्यासाठी ग्राउंड लेव्हलवर काम करावे लागणार आहे. त्याकरता जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या निश्चित केली आहे. सध्या जिल्ह्यात ४१२ बालके कुपोषित आहेत. त्याना विविध उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना दत्तक देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यात, संबंधित अधिकाऱ्यांवर बालकांच्या पालनपोषणाची जबाबदारी देणार आहे. मी स्वतः बालविकास प्रकल्पांना भेटी देणार असून, येथील अंगणवाडी सेविकांशी संवाद साधणार आहे. येत्या चार महिन्यांत कुपोषित बालकांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचा संकल्प आहे. त्यासाठी दर तीन आठवड्यांनी कुपोषणाचा आढावा घेणार आहे. यात, बालकांचे वजन, झालेली सुधारणा याची माहिती घेऊन ती अपडेट करणार आहे.
प्रशासकीय शिस्त आणण्यासाठी काय करणार?
विभागप्रमुख असो वा कर्मचारी वर्ग यांच्याशी सुसंवाद साधून कामकाज करण्यावर प्रयत्न असणार आहे. प्रामुख्याने कर्मचारी टेबलावर राहात नाहीत, शिक्षक शाळेत नसतात, वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी थांबत नाहीत अशा सामान्यांच्या तक्रारी आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेचे स्वतंत्र ॲप आणण्याचा प्रयत्न असून, त्याचे नियंत्रण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात राहील. मुख्यालयात बसून कामकाज करण्यापेक्षा फिल्डवर काम करण्यावर माझा भर असणार आहे. त्याकरता दर आठवड्याला मी अचानक भेटी देणार आहे. यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना भेटी देऊन, येथील कर्मचारी असो की, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधणार आहे.
शिक्षण, आरोग्याबाबत आपल्या काय संकल्पना आहेत?
शिक्षण व आरोग्य यावर काम करण्याचे नियोजन केले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या समस्यांची जाणीव आहे. शाळांना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न असणार आहे. शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजित केले आहे. सुपर ५० उपक्रमांच्या धर्तीवर उत्कृष्ट खेळा़डू तयार करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी विविध संस्थांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) वापरण्यात येणार आहे.