येवला (नाशिक) : संतोष घोडेराव
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या येवला नगरपरिषदेत अजित पवार गटाचे उमेदवार तथा उपमहाराष्ट्र केसरी राजेंद्र लोणारी यांनी नगराध्यक्षपदी बाजी मारल्याने येवल्यात छगन भुजबळच बाहुबली असल्याचे स्पष्ट झाले आहे. येथे मंत्री भुजबळ विरुद्ध आमदार दराडे बंधू यांच्यात झालेल्या प्रतिष्ठेची लढत राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती. अखेर नगराध्यक्ष जागेवर राजेंद्र लोणारी यांनी रुपेश दराडे यांचा पराभव करत विजयाची गदा खेचून आणली.
मतमोजणीला सकाळी दहाला सुरुवात झाली. प्रथम टपाली मतांची मोजणी झाली. यात शिवसेनेचे रुपेश दराडे आघाडीवर होते. प्रभागनिहाय मतमोजणी सुरू झाल्यानंतर सर्व चारच्या चार फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार लोणारी आघाडीवर राहिले. लोणारी यांचा विजय जाहीर होताच समर्थकांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर गुलालाची उधळण करत ढोल- ताशांच्या गजरात पेढे भरवत जल्लोष साजरा केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते भुजबळ समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री भुजबळ यांच्या अनुपस्थित झालेल्या या लक्षवेधी निवडणुकीत माजी खा. समीर भुजबळ, आ. पंकज भुजबळ, दिलीप खैरे यांनी व्यहुरचना करत थेट नगराध्यक्ष लढतीत लोणारी यांनी ११६५ मतांनी आघाडी घेत शिवसेनेचे उमेदवार रुपेश दराडे यांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाच्या विजयासह ११ नगरसेवक निवडून आले. शिवसेनेला १० जागांवर तर भाजपला ३ जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी (शरद पवार गट) अवघ्या दोन जागांवर विजयी झाला.
मंत्री छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीत सर्व कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतली होती. मात्र, जनतेने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास अधोरेखित केला आहे. या विजयाने निश्चितपणे भुजबळ कुंटुबियावरील जनतेचे प्रेम व विकासाला जनतेचा कौल असल्याचे स्पष्ट झाले. येणाऱ्या काळात विकासाचा वेग अधिक जोमाने पुढे घेऊन जाणार आहोत.समीर भुजबळ, माजी खासदार
हा विजय माझा नसून मंत्री छगन भुजबळ यांचा आहे. हा जनतेने दिलेला कौल आहे. भुजबळ यांच्या विकासाबरोबर जनता आहे हे स्पष्ट झाले आहे. अगामी काळात त्यांच्या माध्यमातून आम्ही येवलेकरांची विकासकामे करण्यास कटिबद्ध आहोत.राजेंद्र लोणारी, नवनिर्वाचित नगराध्यक्ष, येवला