Nashik Municipal Election Pudhari News Network
नाशिक

Nashik Municipal Election | आम्ही कोण म्हणुनि काय पुसशी ?

Nashik Municipal Election | नगरसेविकांच्या पतीराजांची आतापासूनच विविध कार्यक्रमांत चमकोगिरी

पुढारी वृत्तसेवा

  1. नाशिक महापालिका निवडणुकीत ६७ महिला नगरसेविका विजयी

  2. सत्कार व कार्यक्रमांमध्ये नगरसेविकांपेक्षा पतीराज अधिक सक्रिय

  3. ‘झेरॉक्स नगरसेवकां’च्या चमकोगिरीची शहरात चर्चा

  4. महिला सक्षमीकरणाच्या घोषणांनाच छेद

  5. महिलांनी प्रत्येक कार्यात स्वतः पुढे राहण्याची गरज व्यक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नुकत्याच पार पडलेल्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक ६७ महिला नगरसेवक निवडून आल्या आहेत. कधी काळी 'चूल आणि मूल' इतक्या पुरत्या मर्यादित असलेल्या महिलांना भारतीय संविधानाने समान अधिकार दिल्याने महिला आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर सर्वच क्षेत्रात कार्याचा ठसा उमटवित आहेत. असे, असले तरी पुरुषी मानसिकता आजही ऐनकेन मागनि त्यांचे वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करत असल्याचे अनेकदा दिसून येते.

विशेषतः सध्या महिला नगरसेविकांचे पतीराज अगदी सत्कार स्वीकारण्यापासून ते इतर सर्वच कार्यक्रमांमध्ये आपण स्वतःच नगरसेवक असल्यासारखे मिरवताना दिसत आहेत. त्यामुळे अशा कार्यक्रमातील या 'झेरॉक्स' नगरसेवकांचा रुतबा म्हणजे 'आम्ही कोण म्हणुनि काय पसुशी' या कवी केशवसुतांच्या ओळींची जणू प्रचितीच उपस्थितांना करून देत आहेत.

महानगरपालिका निवडणुकीत सर्वच पक्षाच्या महिला मोठ्या प्रमाणात निवडून आल्या आहेत. निकाल लागल्यापासून बहुतांशी सर्वच विजयी उमेदवार सत्काराच्या कार्यक्रमांत दंग आहेत. फुलांचे हार, शाल, मोमॅटो, बॅनर आणि भाषणांचा चांगलाच सडा या सत्कारांच्या कार्यक्रमात दिसत आहेत.

मात्र, त्याच बरोबर हे सत्कार सोहळे एका वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहेत, ते म्हणजे कार्यक्रमांत निवडून आलेल्या महिला नगरसेविकांपेक्षा त्यांच्या पतीराजांचा रुतबा अधिक पाहावयास मिळत आहे. यातील अनेक 'झेरॉक्स' नगरसेवकांची चमकोगिरी नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

शहरात वेगवेगळ्या प्रभागांत मतदारांकडून नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचे सत्कार केले जात आहेत. लोकशाहीच्या उत्सवातील ही एक चांगली परंपरा आहे. मात्र, या सोहळ्यांमध्ये नगरसेविकांच्या सत्कारासोबत त्यांच्या पतीराजांचाही सत्कार अनिवार्य बनला आहे. यामुळे आयोजकांचा खर्चही दुप्पट वाढला आहे.

यात हार-तुरे, सन्मानचिन्ह, शाल आदी खर्च हा दुहेरी करावा लागत आहे. विशेष म्हणजे महिला सक्षमीकरण, आरक्षण आणि समानतेच्या घोषणा देत महिला नगरसेविका सत्तेत पोहोचतात. मात्र, सत्कारांच्या या व्यासपीठावर माईक, हार आणि कौतुकाची पहिली रांग पतीराजांनीच व्यापली जात असल्याने नागरिकांमध्ये या पतीराजांच्या कारभाराविषयी चर्चा रंगत आहेत.

फोटोसेशनला सर्वांत पुढे

कुठलेही उद्घाटन, बैठक असो की, अन्य कोणताही कार्यक्रम असला की तिथे नगरसेविकेआधी त्यांच्या पतीराजांचेच फोटोसेशन अधिक चालते. त्यामुळे सर्वसामान्यांना आपण निवडून दिलेला नगरसेवक नेमका कोण हा प्रश्न पडल्या शिवाय राहत नाही. त्यामुळे महिलांनी केवळ निवडून येण्यापुरते न राहता प्रत्येक कार्यात अग्रकमाने पुढे राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT