Nashik wine at Hong Kong International Fair
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भारताच्या वेगाने वाढणाऱ्या वाइन उद्योगाला जागतिक स्तरावर नेण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, दहा आघाडीच्या भारतीय वाइन कंपन्या ६ ते ९ नोव्हेंबरदरम्यान हाँगकाँग कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित 'हाँगकाँग आंतरराष्ट्रीय वाइन आणि स्पिरिट्स फेअर २०२५' मध्ये सहभागी होणार आहेत. नाशिक, पुणे, कर्नाटकसह देशभरातील दहा आघाडीच्या वाइन कंपन्यांचा यात सहभाग असणार आहे.
कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा), भारत सरकारचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि हाँगकाँगचे भारतीय वाणिज्य दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने ऑल इंडिया वाइन प्रोड्युसर्स असोसिएशन यांच्या सहकार्याने या मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम भारत सरकारच्या 'मेक इन इंडिया' मिशनचे अभिमानास्पद प्रतिनिधित्व आहे, जो जागतिक आयातदार, वितरक, सोमेलियर आणि हॉस्पिटॅलिटी व्यावसायिकांसमोर भारतीय वाइन आणि स्पिरिट्सचे प्रदर्शन करतो.
ऑल इंडिया वाइन प्रोड्युसर्स असोसिएशनद्वारे समन्वयित ३० सदस्यांचे भारतीय शिष्टमंडळ वाइन ऑफ इंडिया- सामूहिक ब्रेडिंग मोहीम सादर करेल. ही भारताच्या विकसित होत असलेल्या व्हिटिकल्चर, नावीन्यपूर्णता आणि दर्जेदार कारागिरीचे प्रतीक आहे. या उपक्रमासाठी 'अपेडा'चे अध्यक्ष अभिषेक देव, सहायक महाव्यवस्थापक हरप्रीत सिंग, हाँगकाँगमधील भारताचे वाणिज्यदूत अमन अग्रवाल, तसेच हाँगकाँग व्यापार विकास परिषदेच्या प्रतिनिधींचे सहकार्य लाभत आहे.
हाँगकाँगमध्ये होत असलेल्या या वाइन फेअरसाठी ऑल इंडिया वाइन प्रोड्युसर्स असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश होळकर, सचिव राजेश जाधव, तसेच राजेश बोरसे, मनोज जगताप, प्रदीप पाचपाटील, योगेश माथूर, राजीव सेठ आणि शीतल कदम, - भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत.
या वाइन कंपन्यांचा सहभाग
सहभागी वायनरिजमध्ये सुला वाइनयार्ड्स, ग्रोव्हर झांपा वाइनयार्ड्स, सोमा वाइनयार्ड्स, युनिवाइन, केएलसी वाइन, त्र्यंबा वाइन आणि ग्रेनॉच इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे, तसेच नाशिक, पुणे आणि कर्नाटक सारख्या भारतातील प्रमुख वाइन उत्पादक प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वाइन उत्पादक कंपन्या यात सहभागी होणार आहेत.