नवीन तांबट गल्लीतील 125 वर्षे जुन्या वाड्याला लागलेली आग पाण्याचा मारा करुन नियंत्रणात आणताना अग्निशमन दलाचे जवान  (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Nashik | शहर साखरझोपेत असताना सव्वाशे वर्षे जुन्या वाड्याला आग; कारण काय?

Mysterious News Nashik : सव्वाशे वर्षे जुन्या लाकडी वाड्यास भीषण आग; नवीन तांबट गल्लीत पहाटेची घटना

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शहराच्या मध्यवर्ती भागातील अशोकस्तंभ ते रविवार पेठ दरम्यान असलेल्या लाकडी वाड्यास आग लागल्याची घटना मंगळवारी (दि. 3) पहाटे घडली. सुमारे सव्वाशे वर्षे जुन्या वाड्यास आग लागल्याने वाड्याचे अतोनात नुकसान झाले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

परिसरात बघ्यांची गर्दी

नवीन तांबट गल्लीतील कंसारा मंगल कार्यालयासमोर तांबट बंधूंचा जुना वाडा आहे. वाडा जीर्ण झाल्याने तेथे मागील आठ ते दहा वर्षांपासून कोणीही राहत नव्हते. तसेच वाड्यात वीज जोडणीही नव्हती. संपुर्ण वाडा सागवानी लाकडापासून बनवलेला होता. मात्र मंगळवारी (दि. 3) पहाटेच्या सुमारास या वाड्यास अचानक आग लागली. पहाटे पाच वाजून 49 मिनिटांनी अग्निशमन दलाच्या मुख्यालयात घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंचवटी उपकेंद्रातून दोन बंब व अग्निशमन मुख्यालय शिंगाडा तलाव येथून बाऊजर बंबासह जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी वकिलवाडी रस्ता व रविवार कारंजाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बंब उभे करत पाण्याचा मारा केला. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती.

संपुर्ण सागवानी लाकडापासून बनवलेला वाडा आगीत भस्मसात झाला.

आगीचे कारण काय?

वाडा जीर्ण झाल्याने त्यात कोणीही वास्तव्याला नव्हते, त्यामुळे वीजपुरवठाही खंडीत केला होता. तरीदेखील वाड्यास अचानक आग लागल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. त्याचा शोध घेतला जात आहे.

सकाळी 11 वाजता पुन्हा भडका

मंगळवारी (दि. 3) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जळालेल्या वाड्यामधून पुन्हा धुराचे लोट व आगीच्या ज्वाला भडकल्याचे वाडामालक अतुल तांबट यांनी अग्निशमन दलास घटनेची माहिती दिली. पंचवटी उपकेंद्राचा बंबाने पुन्हा घटनास्थळी येत पाण्याचा मारा करून आग विझवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT