नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सध्या महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. शुक्रवारी (दि. २) झालेल्या माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होताच पक्षीय उमेदवारांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. दुसरीकडे शनिवारी (दि. ३) चिन्हांचे वाटप होताच, अपक्षदेखील मैदानात उतरल्यामुळे प्रचार चांगलाच तापला आहे. दुसरीकडे थंडी मात्र गायब झाली आहे. पारा थेट १४.८ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने, थंडीचा जोर कमी झाला आहे.
उत्तरेकडील वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा अभाव आणि ढगाळ वातावरणामुळे राज्यातील अनेक शहरांच्या किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. पुढील काही दिवस किमान तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गेल्या आठवड्याच्या प्रारंभी म्हणजेच सोमवारी (दि. २९) किमान तापमान ९.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते. उत्तरेकडून थंड वाऱ्याचा जोर वाढणार असल्यामुळे पारा आणखी घसरण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता.
मात्र, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी (दि. १) ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे पारा थेट १३ अंश सेल्सिअसवर पोहोचला. त्यामुळे थंडीचा जोर कमी झाला. रविवारी (दि. ४) तर पारा १४.८ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने, थंडी बऱ्यापैकी गायब झाली आहे. सध्या महापालिका निवडणूक प्रचाराला जोर आला आहे.
येत्या १५ जानेवारी रोजी मतदान असल्याने, कमी कालावधीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर आहे. अशात पहाटेपासूनच प्रचाराला सुरुवात केली जात आहे. थंडीचा जोर कमी असल्यामुळे कार्यकर्त्यांचादेखील उत्साह वाढत आहे. जणू काही ढगाळ हवामान उमेदवारांच्या मदतीलाच धावून आले की काय? अशी चर्चा यानिमित्त रंगत आहे.
कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला
मागील काही दिवसांमध्ये हाडे गोठविणाऱ्या थंडीचा सामना कराव्या लागणाऱ्या नाशिककरांना थंडी कमी झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. थंडी कमी झाल्याचा सर्वाधिक फायदा उमेदवारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना होताना दिसून येत आहे. बरेच उमेदवार पहाटेच प्रचारासाठी घराबाहेर पडत आहेत. अशात कार्यकर्तेही त्यांच्यासोबत उत्साहाने प्रचारास सहभागी होताना दिसून येत आहेत.
ढगाळ वातावरण, पावसाचा अंदाज
गेल्या तीन दिवसांपासून नाशिककरांना ढगाळ वातावरण अनुभवण्यास मिळत आहे. ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली असली, तरी शहरावर अवकाळी पावसाचे सावट आहे. राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने मागील आठवड्यात हजेरी लावली होती. ढगाळ वातावरण कायम राहिल्यास, नाशिकमध्येदेखील पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. दरम्यान, थंडी गायब झाल्याने, नाशिककरांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.