

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चिन्हवाटप होताच, अपक्षांनी प्रचाराचा धुराळा उडवून दिला आहे. ना कार्यकर्त्यांचा फौजफाटा, ना वाहनांचा ताफा, एकट्यानीच प्रभाग पिंजून गाठत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. काही अपक्षांनी दुचाकीवर स्पीकर लावून प्रचार सुरू केला आहे, तर काही अपक्ष हातात माइक आणि स्पीकर घेवून मतदारांना मतदान करण्याचे आव्हान करताना दिसून येत आहे.
१५ जानेवारी रोजी मतदान कमी काळात मतदारांपर्यंत असल्याने, अधिकाधिक पोहोचण्याचे मोठे आव्हान अपक्षांसमोर आहेत. पक्षांनी तिकिट नाकारल्यानंतर अनेकांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. तर नेहमीप्रमाणे अनेकजण यावेळी देखील अपक्ष उमेदवारी करीत नशीब आजमावत आहेत.
निवडणूक आयोगाकडून चिन्ह प्राप्त होताच, हे चिन्ह घरोघरी पोहोचविण्यासाठी अपक्ष उमेदवारांकडून आटापिटा केला जात आहे. ना कार्यकर्त्यांचा फौजफाटा, ना वाहनांचा ताफा, एकट्यानेच अपक्ष घराबाहेर पडून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. एका अपक्षाने आपल्या दुचाकीवर चिन्हाची प्रतिकृती असलेले एक छोटे फलक लावले आहे. तसेच स्पीकरवर देशभक्तीची गीते लावून ते दुचाकी प्रभागातील कानाकोपऱ्यात फिरवत आहेत. तर एक अपक्ष स्पीकर आणि माइक घेत प्रभागात पायपीट करीत आहे.
चौकाचौकात उभे राहून मतदारांना आपला जाहीरनामा या अपक्षाकडून सांगितला जात आहे. काहींकडून ऑटोरिक्षा, टेम्पो या वाहनाच्या तिन्ही बाजुने स्वतःची छबी, अनुक्रमांक आणि चिन्ह असलेला फलक लावून तो प्रभागात फिरवला जात आहे. अपक्षांचा प्रचार मतदारांना आकर्षित करीत असला तरी, तो मतांमध्ये परावर्तीत होणार काय? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सोशल मीडियावर धुराळा
चिन्ह अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे मोठे आव्हान अपक्षांसमोर असल्याने, अपक्षांकडून सोशल मीडियावर देखील प्रचाराचा धुराळा उडवून दिला जात आहे. ठळकपणे दिसेल अशी चिन्हाची छबी असलेले पोस्टर्स सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. मात्र, अपक्षांच्या या प्रचाराकडे निवडणूक आयोग बारीक लक्ष ठेवून आहे.