नाशिक : अवघ्या जिल्ह्यामध्ये थंडीची लाट पसरली आहे. हवेतील गारठ्यात वाढ झाल्याने सर्वसामान्यांना हुडहुडी भरली आहे. रविवारी (दि.२४) निफाडचा पारा ११.८ अंशांपर्यंत खाली आला. तर नाशिक शहरातही पारा १३ अंशांवर स्थिरावला. थंडीच्या वाढत्या कडाक्यामुळे नागरिक गारठून जात आहेत.
हिमालयामधील बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडील बहुतांश राज्यांमध्ये सरासरी तापमानात घसरण झाली आहे. त्याचा परिणाम नाशिक जिल्ह्यासह राज्यातील हवामानावरही पाहायला मिळत आहे. मध्य भारतामधील मैदानी भागांतून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून नाशिकचा पारा १२ ते १३ अंशांदरम्यान स्थिरावला आहे. नाशिक शहरात पहाटेच्या वेळी तसेच रात्री थंड वाऱ्यांचा झोत जास्त प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे थंडीपासून बचावासाठी शहरवासीय उबदार कपड्यांची मदत घेत आहेत. ठिकठिकाणी शेकाेट्या पेटवून त्याभोवती गर्दी केली जात आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पाऱ्यात लक्षणीय घट झाली आहे. निफाडच्या कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रात पारा थेट १२ अंशांखाली नोंद करण्यात आली. अवघ्या तालुक्यात थंडीची लाट जाणवत आहे. वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे द्राक्षबागांना धोका संभवतो. त्यामुळे बागा वाचविण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करत आहेत. त्यामध्ये द्राक्षफळाभोवती पेपर गुंडाळण्यासह बागेत धूरफवारणी केली जात आहे. दरम्यान, अन्य तालुक्यांतही थंडीचा कडाका वाढला असल्याने दैनंदिन शेतीच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. येत्या काळात नाशिकसह राज्यात थंडीचा जोर अधिक वाढेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.