नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरासह जिल्ह्यात थंडीचा जोर वाढत असतानाच किमान आणि कमाल तापमानातील सातत्याने होणाऱ्या चढ-उतारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पहाटे आणि रात्री जाणवणारा गारठा, तर दुपारच्या वेळी वाढणारा उन्हाचा चटका अशा दुहेरी वातावरणाचा सामना नाशिककरांना करावा लागत आहे.
हवामानातील या बदलांमुळे सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे, डोकेदुखी यांसारख्या तक्रारी वाढत असून, आरोग्याच्या वाढत्या तक्रारींमुळे नाशिककर त्रस्त झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शहराचे किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास होते. मात्र, रविवारी (दि. २२) त्यात अचानक वाढ होऊन पारा १२.७ अंशांवर पोहोचला.
दुसरीकडे कमाल तापमान ३०.७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. त्यामुळे सकाळी थंडीचा अनुभव येत असताना दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. निफाडमध्येही किमान तापमान १०.७ अंश, तर कमाल तापमान ३१.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
तापमानातील या बदलांमुळे मानवी शरीराला वातावरणाशी जुळवून घेताना अडचणी येत आहेत. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार अथवा ॲलर्जीचा त्रास असणाऱ्यांना याचा अधिक त्रास जाणवण्याची शक्यता आहे.
सकाळी शाळा, महाविद्यालये तसेच कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना थंडीचा सामना करावा लागत आहे. तर दुपारी तापमान वाढल्याने उबदार कपडे वापरणे गैरसोयीचे ठरत आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सकाळी आणि रात्री उबदार कपड्यांचा वापर करावा, थंड पदार्थ टाळावेत आणि लहान मुलांसह ज्येष्ठांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
नाशिक: कमाल ३०.७, किमान १२.७
निफाड: कमाल ३१.८, किमान १०.७