Water Crisis Water Crisis Pudhari
नाशिक

Nashik Water Crisis | नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईचा हाहाकार! 10 दिवसांत टँकरवर अवलंबून नागरिकांची संख्या 30 हजारांनी वाढली

Nashik Water Crisis | जिल्ह्यात यंदा पावसाने दिलेल्या दीर्घ खंडाचा परिणाम आता ग्रामीण भागात अधिक तीव्रतेने जाणवू लागला आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात यंदा पावसाने दिलेल्या दीर्घ खंडाचा परिणाम आता ग्रामीण भागात अधिक तीव्रतेने जाणवू लागला आहे. पावसाअभावी भूजल पातळीत झालेली घट आणि विहिरींसह नैसर्गिक जलस्रोतांनी तळ गाठल्याने ग्रामीण भागातील पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर होत आहे. विशेष म्हणजे, गत दहा दिवसांत टँकरच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांमध्ये ३० हजार ९६४ ने वाढ झाली असून, टँकरची संख्या ४३ वरून ६२ वर पोहोचली आहे.

नाशिक जिल्ह्यात १६ नोव्हेंबरला १३१ गाव-वाड्यांमध्ये ८४ हजार ५०२ नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. तुलनेत २६ नोव्हेंबरपर्यंत टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या २०५ वर, तर टँकरवर अवलंबून असलेल्या नागरिकांची संख्या १ लाख १५ हजार ४६६ वर पोहोचली आहे. यंदा जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असतानाच पाणीटंचाईचे संकटही अधिक गडद होत आहे.

गत दहा दिवसांपूर्वी येवला, मालेगाव, चांदवड आणि देवळा या चार तालुक्यांतील १३१ गाव-वाड्यांना ४३ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. त्यावेळी दररोज ८० फेऱ्या करून ८४ हजार ५०२ नागरिकांची तहान भागविली जात होती. मात्र, अवघा दहा दिवसांतच परिस्थिती आणखी बिकट झाली असून, आता सहा तालुक्यांतील ५५ गावे आणि १५० वाड्या-पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. यासाठी दोन शासकीय आणि ६० खासगी असे एकूण ६२ टँकर दररोज १२८ फेऱ्या करीत आहेत.

खासगी टँकरवरच प्रशासनाची भिस्त

पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाला खासगी टँकरवरच मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागत आहे. १६ नोव्हेंबरला सुरू असलेले सर्व ४३ टँकर खासगी होते. त्यावेळी शासकीय टँकरची संख्या शून्य होती. मात्र, २६ नोव्हेंबरपर्यंत दोन शासकीय टँकर सुरू करण्यात आले असले, तरी उर्वरित ६० टँकर खासगीच आहेत. दररोज १२८ फेऱ्यांच्या माध्यमातून टंचाईग्रस्त गावांपर्यंत पाणी पोहोचविले जात आहे. त्यामुळे टँकरच्या उपलब्धतेबरोबरच नियमित फेऱ्यांचे नियोजन करणे प्रशासनासाठी महत्त्वाचे ठरत आहे.

दहा दिवसांतील टंचाईचा विस्तार

गत आठवड्याच्या तुलनेत टँकरच्या संख्येत १९ ने वाढ झाली असून, दररोजच्या फेऱ्यांमध्ये ४८ ने वाढ झाली आहे. टँकरवर अवलंबून असलेल्या लोकसंख्येत ३६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. याशिवाय चार तालुक्यांपुरती मर्यादित असलेली पाणीटंचाई आता सहा तालुक्यांमध्ये पोहोचली असून, नांदगाव आणि सिन्नर या तालुक्यांचाही टँकरग्रस्त क्षेत्रात समावेश झाला आहे.

गत दहा दिवसांतील पाणीटंचाई

  • टंचाईग्रस्त गावे-वाड्या : दि. १६ ला १३१, दि. २६ ला २०५.

  • टँकरग्रस्त लोकसंख्या : दि. १६ ला ८४,५०२, दि. २६ ला १,१५,४६६.

  • एकूण टँकर : दि. १६ ला ४३, दि. २६ ला ६२.

  • शासकीय टँकर : दि. १६ ला ०, दि. २६ ला २.

  • खासगी टँकर : दि. १६ ला ४३, दि. २६ ला ६०.

  • दररोजच्या फेऱ्या : दि. १६ ला ८०, दि. २६ ला १२८.

  • टँकरग्रस्त तालुके : दि. १६ ला ४, दि. २६ ला ६.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT