Water Supply Pudhari
नाशिक

Nashik Water Supply | नाशिकमध्ये पाणीकपात होणार की नाही? पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केली भूमिका

Nashik Water Supply | नाशिककरांना मोठा दिलासा! तूर्तास 10 टक्के पाणीकपातीचा निर्णय टळला

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिककरांवर घोंघावणारे दहा टक्के पाणीकपातीचे संकट तूर्तस टळले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. २८) महापालिकेत झालेल्या बैठकीत शहरात तूर्तस पाणीकपात न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मात्र, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने केलेल्या वाढीव पाणीपुरवठ्याच्या मागणीला शासनाने नकार दिला असून, दरवर्षीप्रमाणेच पाणीपुरवठा केला जाईल, असे महाजन यांनी स्पष्ट केले.

बैठीनंतर माध्यमांशी बोलताना महाजन म्हणाले की, भविष्यात पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागू शकतो. मात्र, सध्यातरी असा कोणताही निर्णय झालेला नाही. महापालिकेने वाढीव पाण्याची मागणी केली होती. परंतु अतिरिक्त पाणी देणे शक्य नसल्याने दरवर्षी जेवढा पाणीपुरवठा केला जातो, तेवढाच यंदाही केला जाईल.

दरम्यान, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावाही महाजन यांनी घेतला. ठेकेदारांच्या अडचणी जाणून घेत कुंभमेळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. शहरात सुमारे ५० ते ६० कोटी रुपयांची नवीन कामे प्रस्तावित आहेत. डांबराच्या दरात वाढ झाल्याने ठेकेदारांनी २० टक्के स्टार रेटची मागणी केली होती.

मात्र, एवढी दरवाढ मान्य करता येणार नसल्याचे सांगत दर कमी करण्यास ठेकेदारांना सूचित केल्याचे स्पष्ट केले. किकवी धरणाच्या प्रश्नावर आठवडाभरात बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. धरणातील पाण्याचे बाष्पीभवन रोखण्याच्या उपाययोजनांबाबत, अन्य राज्यांमध्ये यासंदर्भात सुरू असलेल्या प्रयोगांची माहिती घेतली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

बाष्पीभवन रोखण्याचा प्रयोग खर्चाच्या तुलनेत कितपत व्यवहार्य ठरेल, याचा विचार करावा लागेल. त्यादृष्टीने अभ्यास सुरू असल्याचे मंत्री महाजन म्हणाले.

सभागृहनेते पदाचा निर्णय आठवडाभरात

महापालिकेतील सभागृहनेते पदाबाबतचा निर्णय या आठवड्यात घेतला जाईल, असे महाजन यांनी सांगितले. स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीवर काही जण नाराज असल्याचे मान्य करताना ते म्हणाले की, स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी इच्छुकांची यादी मोठी होती. ज्यांना संधी मिळाली ते पक्षाचे कार्यकर्ते आहेत. ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांचाही भविष्यात विचार केला जाईल. सावजी यांच्यासह सर्वांचाच विचार केला जाईल, असे आश्वासनही मंत्री महाजन यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT