Water Crisis Pudhari
नाशिक

Nashik Water Crisis | सलग तिसऱ्या दिवशीही 'पाणीबाणी'

Nashik Water Crisis | पाणीटंचाईने नागरिक त्रस्त; खासगी टँकरचालकांकडून लूट

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ कुंभमेळ्यांतर्गत हाती घेतलेली रस्ता रुंदीकरणाची कामे, स्मार्ट सिटी आणि पाणीपुरवठा यंत्रणेतील अत्यावश्यक दुरुस्ती कामांसाठी नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतलेल्या शटडाउनचा फटका नाशिककरांना सोमवारी (दि.६) सलग दिसऱ्या दिवशीही बसला.

सोमवारी सकाळपासून बाराबंगला, नीलगिरी बाग, पंचवटी तसेच शिवाजीनगर आणि सातपूर जलशुद्धीकरण प्रकल्पावरील पाणीपुरवठा पूर्ववत झाला असला तो कमी दाबाने होत असल्यामुळे शहरातील ८० टक्के पाणीपुरवठा विस्कळीत राहिला. तर नाशिकरोड आणि गांधीनगर येथील पाइपलाइनचे काम अद्यापही सुरूच असल्यामुळे या भागात पाणीपुरवठा बंद राहिला. त्यामुळे पाण्यावाचून नागरिकांचे प्रचंड हाल झाले असून, महापालिकेने उपलब्ध करून दिलेले ३० टैंकर पर्याप्त पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरल्याने खासगी टैंकरधारकांकडून नागरिकांची मोठी लूट केली गेली.

महापालिकेतर्फे शनिवार, दि. ४ व रविवार, दि. ५ एप्रिल रोजी दुरुस्तीविषयक कामांसाठी शटडाउन जाहीर करण्यात आला होता. पाइपलाइन दुरुस्ती, गळती बंद करणे, क्रॉस कनेक्शन, जलकुंभ जोडणी, व्हॉल्व्ह बदल आणि फ्लो मीटर बसविणे आदी कामे या अंतर्गत हाती घेण्यात आली. मात्र वेळेत कामे पूर्ण होऊ न शकल्याने सोमवारी शहरातील अनेक भागांत पाणीपुरवठा होऊ शकला नाही. ज्या भागात पाणीपुरवठा झाला तोही अल्प होता. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळू शकले नाही.

गंगापूर धरणातील थेट पाइपलाइनचे काम पूर्ण झाले असले तरी, काही ठिकाणच्या कामांना उशीर शिवाजीनगर झाला. आणि विल्होळी जलशुद्धीकरण प्रकल्पांवरील पाणीपुरवठा पूर्ववत झाला आहे. तर बाराबंगला, पंचवटी, नीलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्रावरील पाणीपुरवठा सोमवारपासून कमी दाबाने सुरू झाला आहे. त्यामुळे या पाच जलशुद्धीकरण केंद्रांवरून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू झाल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे; परंतु, कमी दाबाने पुरेसे पाणी येत नसल्याने नागरिकांना मात्र पाण्यासाठी टँकरवरच अलंबून राहावे लागले.

नाशिकरोडचा पाणीपुरवठा विस्कळीत

मनपा, स्मार्ट सिटीने हाती घेतलेले ८० टक्के कामे पूर्ण झाले असले तरी गंगापूर डॅम हेडवर्क्स येथे बीपीटीच्या जुन्या व नवीन १७०० मिमी व्यासाचे क्रॉस कनेक्शचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्र येथे रॉ वॉटर ९०० मिमी एम लाइनचे क्रॉस कनेक्शन करण्याचे काम पहाटेपावेतो सुरू होते. गांधीनगर जलशुद्धीकरण येथे रॉ वॉटर ९०० मिमी लाइन १२०० मिमी पाइपलाइनवर क्रॉस कनेक्शन करण्याचे कामही पहाटेपर्यंत सुरू होते. त्यामुळे नाशिकरोड भागात सायंकाळनंतर पाणीपुरवठा केला जाईल, असे पाणीपुरवठा विभागातर्फे नंतर जाहीर करण्यात आले होते.

महापालिकेची मदत अपुरी

दुरुस्तीविषयक कामांसाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे शटडाउन घेण्यात आले असले तरी पाण्याची तीव्र टंचाई असलेल्या भागात पाणीपुरवठ्यासाठी असलेली महापालिकेकडील पाणी टँकरची व्यवस्था मात्र अपुरी ठरली. महापालिकेने २५ टैंकर उपलब्ध करून दिले होते. नागरिकांची तसेच नगरसेवकांची मागणी पाहता ही संख्या ३० पर्यंत वाढवली होती. तरीही टैंकर पुरेसे नसल्याने नगरसेवकांना तसेच अधिकाऱ्यांना नागरिकांच्या संतापाचा सामना करावा लागत आहे. या गोंधळात खासगी टैंकरधारकांनी मात्र अवाच्या सव्वा दराने शुल्क आकारत नागरिकांची लूट केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT