SIR  
नाशिक

Technical Glitches In SIR Process | 'एसआयआर'ला तांत्रिक अडचणींचा फास

Technical Glitches In SIR Process | मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेला तांत्रिक अडचणींचा फटका; नामसाधर्म्य व दुबार नावांमुळे बीएलओंच्या अडचणीत वाढ

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेदरम्यान उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे हजारो नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय समान नावे आणि दुबार नावांच्या नोंदींमुळे बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) यांच्यावर अतिरिक्त कामाचा भारी ताण पडला आहे. निवडणूक आयोगाच्या या महत्त्वाच्या मोहिमेत अपेक्षित सुसूत्रता नसल्याने ग्रामीण आणि शहरी भागात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एसआयआर प्रक्रिया ही मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी महत्त्वाची असते. मात्र, यावर्षी ऑनलाइन पोर्टलवर वारंवार सर्व्हर डाऊन होणे, अपलोड केलेल्या दस्तऐवजांची पडताळणी न होणे आणि फॉर्म सबमिट केल्यानंतर तत्काळ रिस्पॉन्स न मिळणे अशा अनेक तांत्रिक अडचणींमुळे नागरिक हैरान झाले आहेत.

अनेक ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील मतदारांना ऑनलाइन प्रक्रिया कठीण जात असल्याने ते बीएलओंकडे धाव घेत आहेत. जुने नाशिक परिसरातील दोन मतदारांची समान माहिती असलेले प्रकरण समोर आले असून, यात एका सईद शेख नामक नागरिकाला एसआयआर अर्ज प्राप्त होऊनही तो बीएलओकडे जमा करता आला नाही, उलटपक्षी बीएलओ यांना शेख यांच्याकडून अर्ज जमा करून अर्जावरील फोटो जुळणाऱ्या व्यक्तीला द्यावा लागला. अशाच प्रकारे नामसाधर्म्य आणि दुबार नावांच्या समस्येमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

जिल्ह्यात अनेक गावांमध्ये एकाच नावाचे अनेक व्यक्ती असल्याने त्यांची ओळख पटवणे आणि मतदारयादीत योग्य तफावत करणे हे बीएलओंसाठी डोकेदुखी ठरले आहे. दुबार नोंदणी टाळण्यासाठी प्रत्येकाची आधार, फोटो आणि इतर कागदपत्रे तपासणे हे अतिरिक्त काम झाले आहे. त्यामुळे बीएलओंच्या नियमित कामातही व्यत्यय येत आहे.

बीएलओंवरील अतिरिक्त कामाचा ताण कमी करण्यासाठी आयोगाने अधिक सहायक कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी होत आहे. निवडणूक विभागाकडून एनएसएस स्वयंसेवक उपलब्ध करून दिले जात असले तरी त्यांच्याकडे प्रशिक्षणाचा अभाव दिसून येत आहे.

अशा परिस्थितीत नामसाधर्म्य टाळण्यासाठी अद्ययावत सॉफ्टवेअर आणि बायोमेट्रिक पडताळणीचा वापर वाढवावा, असे सुचवण्यात येत आहे. एसआयआर प्रक्रियेमुळे शेवटी मतदारयादी अधिक स्वच्छ आणि अचूक होईल,

अशी आशा व्यक्त केली जात आहे. मात्र, सध्याच्या त्रासामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे. निवडणूक आयोगाने लवकरात लवकर या समस्यांचे निवारण करून प्रक्रिया गतिमान करण्याची गरज आहे, अन्यथा आगामी निवडणुकीच्या तयारीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता

'एसआयआर' प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी नागरिकांना जागरूक करण्यासाठी विविध माध्यमांतून मोहीम राबवल्या जात आहेत. मात्र, तांत्रिक सुधारणा आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता ही मुख्य समस्या असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा अपुरी असल्याने नागरिकांना अधिक त्रास होत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT